धनंजय घोडके
वाई येथील शिंदे कुटुंबियांनी ठेवला समाजासमोर अनोखा आदर्श
वाई – मुलगा हा वंशाचा दिवा आहे अस आजही म्हटलं जाते, त्यामुळेच मुलाचा जन्म झाल्यास पेढे वाटून आनंद साजरा करायचा आणि मुलीचा जन्म झाला की वाईट वाटून घ्यायचं, अशी परिस्थिती आजही समाजात अनेक ठिकाणी पहायला मिळते. मात्र, घरात मुलीच्या जन्माला आनंद झालेल्या शिंदे कुटुंबियांनी समाजासमोर एक वेगळाच आदर्श ठेवला आहे.
शिंदे कुटुंबियांनी नातीच्या जन्माला सामाजिक किनार बांधत वाई येथे जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावे “वीर’ या अभिनव योजनेच्या माध्यमातून एक हजार एकशे अकरा रुपयांची ठेवपावती ठेवण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयाचे वाई शहरासह तालुक्यातही कौतुक होत आहे.
वाई येथील डी. एस. शिक्षण संस्थेचे संस्थापक व माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांच्या कुटुंबात 55 वर्षांपासून एकाही मुलीचा जन्म झाला नव्हता. शिंदे यांचा मुलगा जयदीप आणि स्नुषा स्वप्नाली यांना नुकतेच कन्यारत्न झाले. पहिल्यांदाच कुटुंबात मुलगी जन्माला आल्याने आनंदित झालेल्या शिंदे यांनी आपल्या नातीच्या जन्माचे स्वागत हे अनोख्या प्रकारे विशेष म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत करण्याचे ठरविले. यातूनच त्यांना वाई जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावे एक हजार एकशे अकरा रुपयांचा ठेव पावती करण्याची संकल्पना सुचली आणि त्यांनी तसा ठाम निर्णयच घेतला. या ठेवपावतीच्या योजनेला त्यांनी “वीर’ हे नाव देऊन ही योजना जाहिर केली आहे.
नेहमीच सामाजिक बांधिलकीत अग्रेसर असणाऱ्या शिंदे यांनी “लेक वाचावी, शिकावी व वाढावी’ म्हणून संस्थेच्या माध्यमातून शहरात भीमराव शिंदे महिला महाविद्यालयदेखील सुरू केले आहे. या महाविद्यालयात अनेक गरीब व गरजू मुलींना मोफत शिक्षण दिले जाते. याच विचाराने प्रेरित होवून अभिनव अशी वीर योजना त्यांनी जाहीर केली आहे.
या योजनेअंर्तगत वाई शहराचे नागरिक असलेल्या कोणत्याही दाम्पत्याला कन्यारत्न प्राप्त झाल्यास जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावाने शिंदे 1111 रूपयांची बॅंक मुदत ठेवपावती करणार आहेत. अधिक माहितीसाठी संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे विविध मान्यवरांनी अभिनंदन करून सन्मानित केले.
मुलींना मोफत शिक्षणही देणार
मुलींच्या जन्माचा खऱ्या अर्थाने गौरव होण्यासाठी वाई शहरातील मुलीच्या नावाने 1111 रुपयांची ठेव पावती व संस्थेच्या ब्ल्युमिंगडेल इंग्लिश मीडियम स्कूल, वाई या ठिकाणी प्री-प्रायमरीचे (नर्सरी, ज्यूनिअर व सीनिअर केजी) मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही जयदिप दिलीप शिंदे यांनी सांगितले आहे. दरम्यान, मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याचे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले आहे.