मोदींमुळे अर्थव्यवस्था कोलमडली -वळसे पाटील

कारेगाव – आश्‍वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारमुळे प्रत्येक क्षेत्राची अधोगती झाली आहे. ती इतकी की आता अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे. शेतकऱ्यांची अवस्था तर अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे आता तुम्हीच ठरवा देशाला प्रगतीकडे वाटचाल करणारे हवेत की अधोगतीकडे नेणारे, अशा शब्दांत मोदी सरकारवर टीका करुन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या सर्वागीण विकासासाठी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर तालुक्‍यातील विविध गावांत आयोजित दौऱ्यात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी वळसे पाटील म्हणाले, नोटाबंदीमुळे देशातील कारखानदारी अडचणीत आली आहे. कारखाने येथे यायला तयार नाहीत. तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध नाही. परिणामी देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आलेली आहे. तुम्हाला 15 लाख देण्याचे आश्‍वासन दिले होते. आता काय मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहणार आहात का? असा सवाल करुन ते म्हणाले शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट हमीभाव देण्याचे आश्‍वासन दिले, प्रत्यक्षात काय शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आता या सरकारला हद्दपार केल्याशिवाय गत्यंतर नाही. आपल्याकडे इतिहास मांडणारे, लिहिणारे खूप लोक आहेत; परंतु इतिहास निर्माण करणारे थोडे आहेत. मी तुम्हाला सांगतो उद्या डॉ. अमोल कोल्हे संसदेत गेल्यावर इतिहास निर्माण करतील.

जेव्हा एखादा जवान सीमेवर शहीद होतो. शेतकरी आत्महत्या करतो या घटना राजकारणाचा विषय नसतात. जवान असो की शेतकरी त्यांच्या मागे सर्व कुटुंब उघड्यावर आलेले असते. त्यांच्या मागे पत्नी असते, लहान लहान कच्ची बच्ची लेकरं असतात. या सर्वांचा विचार न करता जेव्हा अशी विधाने येतात, तेव्हा असा प्रश्‍न पडतो, ज्या 56 इंच छातीविषयी सांगण्यात येतं त्या 56 इंच छातीमध्ये भावना असणारं काळीज आहे की नाही? पाच वर्षे हीच परिस्थिती पाहायला मिळाली. आज शेतकऱ्यांची अवस्था तर बिकटच आहे. याला सर्वस्वी सत्ताधारी जबाबदार आहेत.
– डॉ. अमोल कोल्हे, उमेदवार महाआघाडी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.