स्तुत्य! करोनामुळे अनाथ आश्रमाचे आर्थिक गणित कोलमडले; एकाच ‘कॉल’वर प्रवीण माने मदतीला धावले

सोनाईच्या वतीने बालकांना दररोज दूधही देण्यात येणार

रेडा (प्रतिनिधी) – इंदापूर शहरात श्री राम मंदिर येथे श्रावण बाळ आश्रमात 20 अनाथ मुले वास्तव्यास आहेत, लॉकडाऊन,संचारबंदी मुळे राज्यात सर्व ठप्प झाले आहे. याची झळ या अनाथ बालकांपर्यंत पोहोचली आहे. करोनाच्या महामारीत स्वतःचे आरोग्य जपण्यात प्रत्येक नागरिक कष्ट घेतो आहे. मात्र आर्थिक अडचणीचा सामना या बालकांच्या पदरी आल्याने, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती व जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी  जीवनावश्यक वस्तू तात्काळ आश्रमात जाऊन मोफत दिल्या आहेत.

यासंदर्भात माहिती देताना जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने म्हणाले की, करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच गोष्टींची वानवा झाली असताना, समाजाच्या हितासाठी सदैव झटणाऱ्या सामाजिक संस्थांनाही याबाबत बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिथे मोठमोठ्या संस्था, कंपन्या यांची आर्थिक घडी कोलमडली असताना लहान मोठ्या संस्थांनाही या आर्थिक विवंचनेस तोंड द्यावे लागत आहे.

इंदापूर येथे अशाच पद्धतीने कार्यरत असणाऱ्या श्रावणबाळ आश्रम श्रीराम मंदिर या संस्थेत २० मुले-मुली वास्तव्यास आहेत. कोरोनामुळे या संस्थेचे आर्थिक गणित डगमगले असल्याची माहिती कानी आली असल्यामुळे आवश्यक किराणा मालाचे साहित्य बालकांसाठी सुपूर्त केले आहे. इथूनपुढे सोनाईच्या वतीने दररोज दूधही बालकांना देण्यात येणार असल्याची माहिती माने यांनी दिली.

कोरोनाची ही आपत्ती साऱ्या जगावर कोसळली असली तरी आपण आपले सामाजिक भान जपत शक्य त्या सर्वांनाच मदतीचा हात पुढे करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रविण माने यांनी केले. या श्रावणबाळ आश्रम श्रीराम मंदीर संस्थेचे व्यवस्थापन राजू कर्डे महाराज व विशाल कर्डे यांनी उपस्थितीचे स्वागत केले. सचिन राऊत, साधू नरुटे, विजय पाटील, गौरव पवार, प्रविण निगडे उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.