कराड उत्तरला लागलेले नाकर्तेपणाचे ग्रहण हटणार

कराड – ही निवडणूक कोणाला आमदार करायची नव्हे तर कराड उत्तरला लागलेले निष्क्रियतेचे ग्रहण हटविण्याची आहे. सर्वसामान्य जनता व शेतकरी बांधवांच्या पाठबळामुळे हे ग्रहण हटणार असून धैर्यशीलदादांच्या रूपाने दिवाळीची, विकासाची नवी पहाट उजाडेल, असा विश्‍वास जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते भीमराव पाटील यांनी व्यक्त केला. धैर्यशील कदम यांच्या प्रचारार्थ कोरेगाव तालुक्‍यातील धामणेर, धामणेर स्टेशन, सायगाव, सासुर्वे, कण्हेरखेड, अपशिंगे, अंभेरी, पिंपरी, न्हावी या गावांमध्ये झालेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. संपतराव माने उपस्थित होते.

बंडा पैलवान म्हणाले, निवडणुका आल्यावर बोलघेवडे झालेल्या आमदारांनी गेल्या 20 वर्षांत विधानसभेत तोंडही उघडले नाही. त्यामुळे मतदारसंघातील वाड्यावस्त्या मागास राहिल्या. या भागाचा कायापालट करण्यासाठी धैर्यशील कदम यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाच्या मागे उभे राहण्याची गरज आहे.

कोणतेही पद नसताना युती शासनाच्या माध्यमातून मतदारसंघातील रखडलेल्या योजनांसाठी निधी आणला. या योजना मार्गी लावून शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंत पाणी आणले. चांगल्या दर्जाचे रस्ते, आरोग्य सुविधा, तासवडे औद्योगिक वसाहतीला उर्जितावस्था, नवीन उद्योगांना प्राधान्य देणार असल्याचे धैर्यशील कदम यांनी सांगितले.

आमदारांच्या निष्क्रियतेचा त्यांनी समाचार घेतला. पाच वर्षे भाजपमध्ये काम करत असताना किती लोकांच्या अडचणी सोडवल्या, किती निधी आणला, याचा जाब अपक्ष उमेदवाराने जनतेला द्यावा, असे आव्हानही कदम यांनी दिले. दरम्यान, माळवाडी, यादववाडी, वाघेश्‍वर, वडोली भिकेश्‍वर, कवठे, नवीन कवठे, कोणेगाव, कांबीरवाडी, हणबरवाडी, कोरिवळे, साबळेवाडी, अंधारवाडी, खालकरवाडी, शितळवाडी, चरेगाव व रिसवड या भागातील प्रचार दौऱ्याला उदंड प्रतिसाद मिळाला. धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश वळकुंदे, तालुकाध्यक्ष सुनील कचरे व हिंदुराव हाके-पाटील यांनी धैर्यशील कदम यांच्या पाठीशी राहण्याचे जाहीर केले. स्वाभिमानी युवा मोर्चाचे संतोष चव्हाण, भोसलेवाडी सोसायटीचे शशिकांत भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)