पुरंदरचा पूर्व भाग अद्याप तहानलेलाच

टॅंकर अवलंबून गावे

सोनोरी, पांडेश्‍वर, दिवे, पवारवाडी, झेंडेवाडी, वाल्हा, सुकलवाडी, नावळी, गुरोळी, खानवडी, वागदरवाडी, दौंडज, राख, टेकवडी, नायगाव, साकुर्डे (जेजुरी ग्रामीण), राजुरी, पिंपरी, पारगाव, दिवे गावठाण, माळशिरस, मावडी कप, निळूंज, कुंभारवळण, भिवरी, वनपुरी, उदाचीवाडी, जवळार्जून, कोळविहीरे, बेलसर, रीसे, पिसे.

वाघापूर – पुरंदर तालुक्‍यात खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांनी शेतातील पेरणीची कामे बऱ्यापैकी उरकली आहेत. त्यामुळे आता केवळ प्रतीक्षा आहे ती पावसाची. सध्या पिकांना पाणी मिळाल्यास पिके जोमात येतील, परंतु ऐन गरज असताना पावसाने चांगलीच दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तर तालुक्‍याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण फारच अत्यल्प असल्याने संपूर्ण परिसर अद्यापही तहानलेलाच आहे. तर पाऊस झाला नाही तर संपूर्ण पिकेच धोक्‍यात येण्याची चिन्हे आहेत.

मागील महिन्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. तसेच शेतीकामांना चांगलाच जोर आला होता. शेतकऱ्यांनी बी-बियाणे खरेदी करून पेरणीही उरकून घेतली आहे. तालुक्‍याचे खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेले वाटाणा त्याचबरोबर बाजरी, भुईमूग, तूर, पावटा तसेच तरकारी पिके, भाजीपाल्याची पिके, कडधान्याची पेरणी केली आहे. सध्या सीताफळ हंगाम सर्वत्र सुरू झाला आहे.

एकंदरीतच शेतकरीवर्ग शेती कामात व्यस्त आहे. तर काही भागात शेतीची कामे बऱ्यापैकी उरकली आहेत. त्यामुळे आता केवळ प्रतीक्षा आहे ती म्हणजे पावसाची, परंतु पावसाने अशी काही दडी मारली आहे कि, शेतकऱ्यांच्या काळजात एकदम धस्स झाले आहे. तालुक्‍याचा पूर्व भाग हा कायमच दुष्काळी म्हणून समजला जातो. या भागातील वनपुरी, सिंगापूर, वाघापूर, टेकवडी, माळशिरस, पोंढे, राजेवाडी, पिसार्वे, नायगाव, पारगाव या परिसरात अद्यापही पावसाचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेवर बियाणांची पेरणी केली आहे, परंतु पाऊस पडत नाही. जर लवकर पाऊस पडला नाही, तर पेरलेले बियाणे जळून जाण्याची भीती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)