पुणे – तब्बल 21 कोटी रुपये खर्च करून उभारलेली महापालिकेच्या शाळासांठीची ई- लर्निंग यंत्रणा धूळखात पडून असल्याचे समोर आले आहे. एकूण 270 शाळा आणि त्यामधील सुमारे 840 वर्गांमध्ये ऑनलाइन अभ्यासक्रम शिकविण्याची सुविधा या प्रकल्पात आहे. मात्र, मुख्याध्यापक आणि शिक्षकांची उदासीनता आणि प्रशासनाचे त्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळे ही यंत्रणाच वापरली जात नसल्याचे समोर आले आहे.
महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेत शिक्षण विभागाच्या शाळांसाठी ही योजना आणली होती. मात्र, नंतर ती खर्चासह कामास होणारा उशीर,यंत्रणेची होणारी चोरी, या ऑनलाइन अभ्यासक्रमाला बालभरातीची नसलेली मान्यता अशा वेगवगेळ्या कारणास्तव चांगलीच गाजली. अखेर लोकसभा निवडणुकीपूर्वी हा प्रकल्प पूर्ण करून त्याची सुरुवात सर्व शाळांमध्ये करण्यात आली. त्यामुळे पालिका शाळांमधील मुलांना त्याचा फायदा होईल, असे वाटत असतानाच उद्घाटनानंतर अवघ्या काही महिन्यांतच तिचा वापर होत नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पात सर्व वर्गातील मुलांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला असून तो दैनंदिन शिकविला जाणे अपेक्षित असताना, अनेक शाळांमध्ये उद्घाटनानंतर ही यंत्रणा पुन्हा वापरण्यात आलेली नाही. त्यामुळे कोट्यवधींची ही यंत्रणा वापराविना धूळखात पडून आहे.
वापराचे अहवालाच नाहीत
कोणत्या शाळांमध्ये किती तास, कोणता अभ्यासक्रम किती मुलांना शिकविण्यात आला याचा कोणताही अहवाल प्रशासनाकडे नाही. प्रत्यक्षात ही यंत्रणा बसविण्यात आल्यानंतर ज्या ज्या वर्ग खोल्यांमध्ये ही यंत्रणा आहे त्यानुसार, अभ्यासक्रम शिकविण्याचे वेळापत्रक शिक्षण विभागाकडून करणे आवश्यक होते. तसेच त्यानुसार, या ई-लर्निंग प्रणालीमधून मुलांना अभ्यासक्रम शिकविणे आवश्यक होते. मात्र, तसे कोणतेही वेळापत्रक नसल्याने ही यंत्रणा अधून मधून फक्त मुख्य स्टुडिओच्या माध्यमातून मुलांना घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य याबाबत माहिती देण्यासाठी उपयोगात आणण्यात येते. दरम्यान, याबाबत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.