मद्यधुंद कर्मचाऱ्याने पोलिसांच्या भीतीने ठोकली धूम

पाथर्डी – पाथर्डी नगरपालिका कार्यालयात पालिका कर्मचारीच मद्यपान करून येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी ही गोष्ट मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर पालिका प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत पोलिसांना पाचारण केले. पोलीस येणार असल्याची खबर संबंधित कर्मचाऱ्याला कळताच त्याने कार्यालयातून धूम ठोकली. या प्रकरणाची रंगतदार चर्चा सध्या शहरात सुरू आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पालिकेच्या मालकीचा जेसीबी नेमका कुठे आहे? अशी लेखी विचारणा सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी पालिकेच्या स्वच्छता विभागाकडे केली होती. संबंधित माहिती अधिकारातील पत्राच्या पुढील कार्यवाहीची माहिती घेण्यासाठी आव्हाड आज दुपारी पालिका कार्यालयात पोहोचले. स्वच्छता विभागाचे निरीक्षक दत्तात्रय ढवळे पालिका कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत उपस्थित होते.

आव्हाड यांनी पालिकेच्या जेसीबी संदर्भात माहिती देण्याची मागणी केली. यावर ढवळे यांनी आपणच खूप दारू प्यायलो आहोत. मला खूप टेन्शन आहे, आज तुम्हाला याबाबत मी कुठलीही माहिती देऊ शकत नाही. तुम्ही उद्या या तुम्हाला सर्व काही सांगतो असे सांगितले. यावर आव्हाड यांनी सदर बाब कार्यालयीन अधीक्षकांच्या निदर्शनात आणून दिली व मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संबंधित कर्मचाऱ्याची मेडिकल टेस्ट करण्याची मागणी केली. आव्हाड यांनी याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.

मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी कार्यालय अधीक्षकांशी संपर्क साधून घटनेची खातरजमा करून घेतली. संबंधित कर्मचारी मद्य पिऊन उपस्थित असल्याची खात्री झाल्यानंतर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षकांना पत्र देऊन संबंधित कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस बंदोबस्त मागवला.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही संबंधित कर्मचाऱ्याची वैद्यकीय चाचणी करण्याचे लेखी पत्र दिले. पालिका कार्यालयात पोलीस पोहोचताच संबंधित कर्मचाऱ्यांनी पालिका कार्यालयातून धूम ठोकली. रात्री उशिरापर्यंत संबंधित कर्मचाऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू होता. वेगवेगळ्या विषयांवरून पालिकेचा कारभार नेहमीच चर्चेत असतो. पालिकेत कर्मचारी दारू पिऊन नागरिकांशी उद्धटपणे बोलतात अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. आजच्या घटनेने पालिका प्रशासनाची लक्तरे वेशीला टांगली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.