आंतरराष्ट्रीय कोरल ड्रॉ स्पर्धेत जगात मिळविला तिसरा क्रमांक
कोपरगाव – वडील रात्रंदिवस तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी टमटम चालवतात, घरची गरिबी, आई-वडिलांचे शिक्षणही जेमतेम. पण आपल्या वडिलांचे नाव जिद्दीने कॅनडा सारख्या विकसित देशात काढलं त्या सुरेगावच्या मुलीचं नाव आहे सुषमा. आंतरराष्ट्रीय डिझायनिंग स्पर्धेत तिने जगात तिसरी क्रमांक मिळविला. आता तिला हॉंगकॉंग येथे दोन वर्षे उच्च शिक्षणासाठी जायचं आहे. पण हाती पैसा नाही त्यासाठी तिचे वडील याचना करत आहेत.
कॅनडा येथे कोरल ड्रॉ इंटरनॅशनल स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. त्यात हजारो स्पर्धक सहभागी झाले होते. सुरेगावातील सुषमा अंबादास सोनवणे हिने स्पर्धेची तयारी करून त्यात भाग घेतला आणि चक्क तिचा जगात तिसरा, तर भारतात पहिला क्रमांक आला आहे. त्याबद्दल तिला एक लाख 17 हजार रुपयांचे बक्षीसही मिळाले आहे. सुषमाच्या अंगी असलेली जिद्द व कष्टाच्या बळावर तिने आई-वडिलांचे नाव उंचावले आहे. टेक्स्टाईल इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचे असल्याने तिने इचलकरंजी येथील दत्ताजी कदम टेक्स्टाईल इंजिनीअरिंग महाविद्यालयात प्रवेश मिळवला. तेथे ती आता बीटेकच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे.
शिक्षण घेत असतानाच तिने डिझाइनिंगच्या असंख्य स्पर्धांत यश मिळवले. सध्या बेंगळुरू येथे प्रशिक्षण सुरू आहे. कॅनडा येथे झालेल्या कोरल ड्रॉ इंटरनॅशनल स्पर्धेत तिचा जगात तिसरा क्रमांक आला. त्याच्या जोरावर तिला आता हॉंगकॉंग येथे दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे.
परदेशात शिक्षण घेणं सोपं नाही. पण तिने आपल्या वडिलांना मला शिकायचं आहे, असं सांगितलंय. वडील आंबादास सोनवणे यांचे शिक्षण जेमतेम. एसटी महामंडळात नाशिक येथे चालक म्हणून नोकरी करू लागले. पण मुलांच्या शिक्षणाआड नोकरी येत असल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्यांचा मोठा मुलगा संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकला.
तो पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. दुसरा मुलगा नगरच्या शासकीय महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे धडे घेत आहे. मुलांच्या शिक्षणासाठी सध्या ते कोळपेवाडी ते शिर्डी या मार्गावर दिवसभर टमटम चालवतात. एकीकडे साईबाबांच्या दानपेटीत कोट्यवधीचे दान टाकणारे भाविक आहेत, तर दुसरीकडे पोटच्या मुलीला टेक्स्टाईल इंजिनिअर करण्याच्या स्वप्नासाठी टमटमच्या प्रवासातील प्रत्येक थांब्यावर ठोकर खाऊन मिळेल त्यात आनंद मानून मुलीच्या शिक्षणाची जिद्द पूर्ण करण्यात आंबादास सोनवणे धन्यता मानत आहेत.
सुषमाच्या या यशाबद्दल माजी मंत्री शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे संचालक विलासराव वाबळे, मोहनराव वाबळे, राजेंद्र कोळपे, निशांत वाबळे आदींनी अभिनंदन केले आहे.