काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! दीडशे फूट दरीत कार कोसळूनही चालक “सुखरूप’

राजगुरूनगर  – मध्यरात्रीच्या वेळेस, नवीन खेड घाटातून मोटार दगडधोंड्यांवर आपटत दीडशे फूट खोल दरीत पडली, तरी प्रवासी चालकाचा जीव वाचल्याची किमया सोमवारी रात्री घडली. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय आला. पोलीस व कार्यकर्ते वेळेत पोहचल्याने त्याचे प्राण वाचले.

सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास, पुणे नाशिक महामार्गावरून एक फियाट कंपनीची मोटार (एमएच 15 एफएन 1573) नाशिककडून पुण्याकडे चालली होती. संजय मधुकर खैरनार (वय 49, रा. नाशिकरोड, नाशिक) हे स्वतः गाडी चालवत होते. ते पुण्यातील आपल्या साडूंकडे चालले होते. नवीन खेड घाटातून मोटार जात असताना नादुरुस्त वाटत होती, म्हणून त्यांनी ती एका बाजूला घेतली आणि गिअर – ऍक्‍सेलेटर तपासत होते. तेवढ्यात अचानक त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी डाव्या बाजूच्या दरीत सुमारे दीडशे फूट खोल पडली.

नुकतेच घाटाचे काम झालेले असल्याने मोठ्या दगड-गोट्यांचा भराव केलेला आहे. त्यावरून आपटत आणि नंतर झाडाझुडुपांवर आदळत गाडी खाली जाऊन एका ठिकाणी अडकली.
कुणीतरी भल्या माणसाने ताबडतोब खेड पोलिसांना फोन केला. सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड, पोलीस स्वप्नील गाढवे, संतोष घोलप, शेखर भोईर, अर्जुन गोडसे, होमगार्ड गुलाब लोखंडे, बाळा भांबुरे आदी पोलीस व होमगार्ड काही तरूणांसह तेथे तात्काळ पोहचले. ते खाली उतरून मोटारीजवळ पोहचले. त्यांनी काचा फोडून खैरनार यांना बाहेर काढले.

खैरनार मागच्या व पुढच्या सीटांमध्ये अडकलेले होते. ते जवळपास बेशुद्ध होते; पण कुठलीही मोठी जखम, रक्तस्राव दिसत नव्हता. सर्वांनी मिळून उचलून त्यांना वर रस्त्यावर आणले आणि रुग्णवाहिकेतून लगेच सुश्रुत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ते ठीक असून गंभीर जखमी नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. वेळीच पोलिसांना समजल्याने आणि लवकर मदत पोहचविल्याने खैरनार त्यांचे प्राण वाचले. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, अशी भावना यावेळी मदत करणाऱ्यांनी व्यक्त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.