कारचालकास कोयत्याने वार करुन लूटण्यात आले. ही घटना गुरुवारी रात्री आंबेगाव बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी दुचाकीवरील तीन अज्ञात व्यक्तींविरुध्द सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महादेव जाधव(40,रा.आंबेगाव बुद्रुक) हे त्यांच्या टाटा इंडिको कारने चालले असताना त्यांना नऱ्हे येथे रहात्या सोसायटीजवळ मोबाईलवर कॉल आला होता. यावेळी ते कार थांबवून बाहेर उतरुन मोबाईलवर बोलत होते. इतक्यात दोन काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन तीन अज्ञात व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी फिर्यादीच्या डाव्या हातावर कोयत्यासारख्या हत्याराने वार करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर त्यांच्याकडील दोन सोन्याच्या अंगठ्या, एक मोबाईल व रोख 7 हजार असा 47 हजार रुपये किंमतीचा ऐवज जबरदस्ती लूटून नेण्यात आला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही.जे.महांगडे करत आहेत.