भारतीय संघाला भारतात पराभूत करण्याचे स्वप्न

ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने व्यक्‍त केले मत

मेलबर्न –भारतीय क्रिकेट संघाला त्यांच्याच देशात पराभूत करण्याचे स्वप्न आहे. हे स्वप्न जर पूर्ण झाले तरच माझी कारकीर्द यशस्वी झाली असे समजेन, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथ याने आपल्या भावना व्यक्‍त केल्या आहेत.

भारतीय संघाला मायदेशात पराभूत करणे अत्यंत कठीण आहे. त्यांच्याकडील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजीला जास्त मदत करतात हे खरे असले तरी गेल्या तीन मोसमांपासून त्यांच्याकडे जसप्रीत बुमराह, महंमद शमी, भुवनेश्‍वर कुमार आणि ईशांत शर्मा असे चार जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. त्यांनी एकदिवसीय, टी-20 व कसोटी या क्रिकेटच्या तीनही प्रकारात सातत्याने सरस कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर धावा करणे हेच मोठे आव्हान राहील. तसेच सध्याच्या आमच्या संघातील गोलंदाजांचे परीक्षण करायचे झाले तर त्यांच्याकडे गुणवत्ता आहे पण अनुभव नाही. आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू सहभागी होतात पण कसोटी सामन्यात त्यांच्याकडून भारताच्या दिग्गज फलंदाजांवर अंकुश ठेवला गेला तरच भारतात मालिका विजयाचे स्वप्न पूर्ण होईल, असेही स्मिथ म्हणाला.

ज्या पद्धतीची लढत इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस मालिकेत होते तशीच खुन्नस भारताविरुद्धच्या मालिकांमध्ये गेल्या काही वर्षांत दिसून येते. ऍशेस मालिकेत इंग्लंडचा त्यांच्याच भूमीत पराभव करणे हे माझे स्वप्न आहे तसेच भारताला भारतात पराभूत करणेही स्वप्न आहे. जेव्हा मी निवृत्ती घेईन त्यावेळी ही दोन्ही स्वप्ने पूर्ण झाली असतील तर कारकिर्दीची अखेरही यशस्वी झाली असे मी समजेन, असेही स्मिथ म्हणाला.

Leave A Reply

Your email address will not be published.