नवीन महाबळेश्‍वर पर्यटन प्रकल्पाचे स्वप्न साकार होणार

सूर्यकांत पाटणकर
राज्य शासनाची नवी अधिसूचना; स्थानिकांच्या आशा पल्लवित
पाटण 29, जावली 15, सातारा 8, अशा 52 गावांचा समावेश

पाटण  – पाटण तालुक्‍यासह सातारा जिल्ह्यातील पर्यटनाचे भाग्य उजळविणाऱ्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला पुन्हा अच्छे दिन येणार, हे आता स्पष्ट झाले आहे. 2004 साली आघाडी शासनाच्या काळात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्रीपदाच्या काळात मंजूर झालेला हा प्रकल्प गेली अनेक वर्षे लालफितीतच अडकून होता. विद्यमान सरकारने पुन्हा नव्याने याची अधिसूचना काढली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वतीने हा प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहे.

यासाठी विशेष नियोजन प्राधिकरणाची नियुक्ती करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. नवीन महाबळेश्वर प्रकल्पात जिल्ह्यातील 52 गावांचा समावेश असून त्यात सर्वाधिक अशी तब्बल 29 गावे ही पाटण तालुक्‍यातील तर 15 जावली व सातारा तालुक्‍यातील 8 गावांचा यात समावेश आहे. या प्रकल्पामुळे पाटण तालुक्‍यातील पर्यटनाचे भाग्य उजळणार असल्याने येथील विकासासाठी हा प्रकल्प निश्‍चितच मैलाचा दगड ठरणार आहे.

नवीन महाबळेश्वर प्रकल्प हा निश्‍चितच सातारा जिल्ह्यातील पर्यटनासाठी सर्वात मोठे माध्यम ठरणार, याच उद्देशाने 2004 मध्ये माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना याची संकल्पना, आराखडा शासन दरबारी मांडला होता. प्रामुख्याने पाटण तालुक्‍यातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा सकारात्मक वापर होवून भूकंप, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीवर मात करत येथे एकमेव पर्यटन हाच एकमेव उपाय या भावनेतून हा प्रकल्प समोर आणला गेला. त्याकाळात मंत्री मंडळाने याला तात्काळ मंजूरीही देवून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने हा प्रकल्प साकारण्यासाठीचे प्रयत्नही झाले.

एवढेच नव्हे तर यामुळे संबंधित गावात मोठ्या प्रमाणावर असलेल्या नापीक, पडीक व डोंगराळ तसेच खडकाळ जमीनीवर साधी कुसळंही पिकत नव्हती, अशा ठिकाणच्या जमिनींना लाखोंचे भावही मिळाले. स्थानिकांसह राज्य व परराज्यातील अनेक उद्योजकांनी येथे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकही केली. परंतु त्यानंतर एका बाजूला विधानसभा निवडणुकीत पाटणकरांचा पराभव झाला तर दुसरीकडे त्याला राजकीय विरोध झाला आणि सार्वत्रिक नंदनवन ठरणारा हा प्रकल्प बारगळल्याने स्थानिक हजारोंच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला.

सुदैवाने आता तब्बल पंधरा वर्षानंतर हा लालफितीतच अडकलेल्या प्रकल्पाबाबत विद्यमान सरकारने उशीरा का होईना. पण शेवटच्या क्षणी सकारात्मक पावले उचलली आहेत. यातूनच ही अधिसूचना काढण्यात आल्याने पुन्हा या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यातूनच शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची यात विशेष नियोजन प्राधिकरणाची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच पुन्हा हा प्रकल्प मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या प्रकल्पामध्ये पाटण तालुक्‍यातील आंबेघर तर्फ पाटण, चिरंबे, गाढखोप, कारवट, नहिंबे, दास्तान, कुसवडे, रासाटी, देवघर तर्फ हेळवाक, गोषटवाडी, आरल, कुशी, भारसाखळे, बाजे, घाणबी, बोंद्री, वांझोळे, चाफोली, दिवशी खुर्द, काठी, नानेल, सावरघर, वाटोळे, गोजेगाव, खिवशी, वाजेगाव, भांबे, घेरादातेगड, केर या 29 गावांचा तर जावलीतील उंब्रेवाडी, वेळे, वासोटा, सावरी, कसबे बामणोली, अंधेरी, कास, म्हावशी, माजरे शेवंदी, मौजे शेवंदी, फळणी, देऊर, वाघळी, मुनावळे, जांबरूख या 15 व सातारा तालुक्‍यातील चाळकेवाडी, ठोसेघर, धावली, आलवडी, जांभे, नावली, चिखली, केळवली या आठ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

या नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. स्थानिक तसेच बाहेरच्या छोट्या-मोठ्या उद्योजकांच्या गुंतवणुकीसोबतच त्यासाठी आवश्‍यक त्या सेवा-सुविधांची उपलब्धता ही शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. यातूनच हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरी, रोजगार व व्यवसायाची संधी मिळणार आहे. तर पूर्णतः नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असलेल्या प्रगतीपासून वंचित राहिलेली संबंधित गावे, तालुके व सातारा जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.