पुणे – करोना विषाणूचा सामना करण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) देखील मैदानात उतरली असून, संस्थेच्या पुण्यासहित सर्व प्रयोगशाळांमध्ये सॅनिटायझरची युद्धपातळीवर निर्मिती केली जात आहे. इतकेच नव्हे, तर आरोग्य कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी संस्थेतर्फे “वैयक्तिक किट’ विकसित करण्याचे काम देखील केले जात आहे.
सध्या देशभरामध्ये विविध पातळ्यांवर करोनाचा आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. याच स्थितीत सध्या सॅनिटायझरचादेखील मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी यामध्ये आता डीआरडीओ सहभागी झाली आहे. यासह लष्कराच्या जबलपूर, खडकी, अवडी, अंबरनाथ येथील रुग्णालयांमध्ये संस्थेकडून विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात येत आहे. युद्ध पातळीवर व्हेंटिलेटर तयार करण्यासाठी डीआरडीओकडून खासगी क्षेत्रातील काही उत्पादकांशी चर्चा करण्यात येत आहे. यासह संरक्षणात्मक किटच्या पहिल्या तुकडीचे वैद्यकीय निकषांना मान्यता मिळाल्यानंतर, पुढील निर्मिती करण्यात येणार आहे.
मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझर आणि जंतूनाशक तयार करण्यासाठी संस्था स्वत:चे तंत्रज्ञान आणि पद्धती विकसित करणार असून, एकाच पद्धतीने डीआरडीओच्या प्रयोगशाळांमध्ये निर्मिती होणार आहे. विविध संस्था, शासकीय कार्यालयांना याचे दररोज वितरण करण्यात येत आहे, अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली. मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आतापर्यंत सुमारे 15 हजार सॅनिटायझरचे वितरण विविध यंत्रणांना पाठवले आहे, असे संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.