विधानसभेसाठी भाजपकडून आराखडा तयार

जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस टार्गेट : प्रत्येक मतदारसंघात असणार आव्हान

पुणे – राज्यात सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने मोठी तयारी केली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याचा निवडणूक आराखडाही पक्ष पातळीवर तयार करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होत असली तरी जिल्ह्यातून हे दोन्ही पक्ष पूर्णत: नेस्तनाबूत करण्याकरिता बारामती, इंदापूर, भोर या सारखे महत्त्वाचे मतदासंघ

टार्गेट करण्याकरीता दिल्लीतून रसद मिळणार आहे. याकरिता काही तालुक्‍यांत शिवसेनेची मदत घेतली जाणार आहे. विधानसभा निवडणूक आघाडी करून लढविण्याच्या तयारीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस असले तरी भाजप आणि शिवसेना युतीकडून या पक्षांना मोठे आव्हान निर्माण करण्याकरिता मतदार संघनिहाय व्यूहरचना आखली जात आहे.

लोकसभा निवडणुकीत देशासह राज्यपातळीवर भाजपला मोठे यश मिळाले. परंतु, जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद टिकून असल्याचे मतांच्या आकडेवरून समोर आले आहे. यामुळे राज्यातही एकहाती सत्ता मिळवण्याकरिता भाजपने जय्यत तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीकरीताही भाजपने रणनिती आखली असून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसह अन्य पक्षीय आजी, माजी आमदारांसह वरिष्ठ नाराज पदाधिकारी आणि नवे उमदे कार्यकर्ते यांच्याशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. भाजपने आता राज्यासह जिल्ह्यातही आपले स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण करण्याकरिता रणनिती आखली असून शिवसेनेला आली तरी बरोबर घ्यायचे अन्यथा एकट्याने वर्चस्व वाढविण्याची तयारीही पक्षाने ठेवली आहे.

जिल्ह्यात वर्चस्व असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस खिळखिळी करण्याकरिता प्रयत्न केले जात असून फोडाफोडीचे राजकारण काही दिवसांतच उघड होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, पहिल्या टप्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील अनेक मातब्बर इच्छूक भाजप वरिष्ठांच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात आहे. दुसरा कोणी जाण्यापूर्वी आपणच संपर्क साधून जागा मिळवण्यासाठी अनेक जणांनी भाजपशी या-त्या मार्गाने संपर्क वाढविला असल्याची चर्चा आहे. भाजपची ही रणनिती जिल्ह्यात यशस्वी ठरणार का, यावर राजकीय गणिते अवलंबून आहेत.

गेल्या विधानसभेत (2014) ज्या-ज्या ठिकाणी पक्षाला अपयश आले, अशा ठिकाणच्या जागा पदरात पाडून घेण्याकरिता भाजपकडून प्रयत्न केले जाणार असल्याने भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यास इच्छूक असणाऱ्यांना हेरले जात आहे. तसेच, शिवसेनेशी युती झालीच तर ज्या ठिकाणी शिवसेनचा उमेदवार उभा राहील, त्या ठिकाणी शिवसेनेला ताकद देण्याचे धोरण भाजपचे असणार आहे. यामुळे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाने आघाडी करून एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला तरी त्याचा सर्वाधिक फायदा भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांनाच होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. एकूणच आघाडीला कोंडीत पकडण्याची रणनिती भाजपकडून आखली जात आहे. याकरिता निवडणुकीचा प्रारूप आराखडाही तयार करण्यात आला असल्याची चर्चा आहे. या आराखड्यानुसार कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे किमान आजी-माजी तसेच इच्छूक उमेदवार पक्षात ओढण्याचे “टार्गेट’ आहे. या पार्श्‍वभुमीवर येत्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्यासह पक्षातील मातब्बरांना रोखण्याचे आव्हानही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससह अन्य पक्षांना असल्याचे, सांगितले जात आहे.

विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघातून तुल्यबळ उमेदवार देण्यात येणार असून याकरिता संबंधित इच्छुकांशी चर्चा करून तसेच मतदार संघाचा अभ्यास करूनच योग्य त्या उमेदवारालाच उमेदवारी देण्याचे धोरण असणार आहे. पक्षात येण्याचा अनेकांचा प्रयत्न असला तरी योग्य त्यालाच संधी देण्याची वरिष्ठांचे धोरण असेल.
– बाळासाहेब भेगडे, जिल्हाध्यक्ष, भाजप


विरोधी पक्षाने कसलीही तयारी केलेली असली तरी त्याला सर्व पातळ्यांवर तोंड देण्याकरिता पक्ष तयार आहे. विरोधकांकडून करण्यात येणारे बहुतांशी दावे हे पोकळ आहेत. लोकसभेतील राष्ट्रवादीच्या मतांची आकडेवारी पाहिली तर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षच भक्कम असल्याचे दिसते. त्यामुळे विधानसभेचे चित्र वेगळे असेल.
– प्रदिप गारटकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी


भाजप-शिवसेना युतीने कितीही आराखडे बांधले तरी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसलाच मोठे यश मिळणार आहे. आघाडीच्या ताब्यात असलेले मतदारसंघ आमच्याच ताब्यात राहतील. शिवाय, युतीच्या ताब्यातील मतदारसंघही आम्ही ताब्यात घेवू. याकरिता आम्हीही तयारी केली आहे.
– संजय जगताप, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस

Leave A Reply

Your email address will not be published.