पिंपरी (प्रतिनिधी) – गणपती बाप्पा मोरयाचा गजर…, फुलांच्या पाकळ्यांची उधळण…, ढोल-ताशांचा दणदणाट…, आले रे आले बाप्पा आले, असा चिमुकल्यांचा किलबिलाट अशा भक्तीमय आणि उत्साहाने भारलेल्या वातावरणात घरोघरी आज लाडक्या बाप्पांची स्वारी दाखल झाली. मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना करीत देशावरील मंदीचे सावट हटू दे, असे साकडे गणरायांना घालण्यात आले.
महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेतील गणेशोत्सवाला सोमवारपासून मंगलमय वातावरणात सुरूवात झाली. बाप्पांच्या स्वागताची तयारी पहाटेपासून सुरू होती. प्रतिष्ठापनेची पूर्वतयारी, नैवेद्य, पूजेची तयारी करण्यामध्ये महिला वर्ग व्यस्त होता.
रांगोळीच्या पायघड्या घालत दारावर आकर्षक तोरणे बांधण्यात आली. बालचमूंचा उत्साह अवर्णनीय होता. हातात पूजेचे ताट, मस्तकावर टोपी आणि मुखाने मोरयाचा गजर करत पारंपारिक वेशभूषेत आबालवृद्ध रस्त्यावर दिसत होते. बाप्पांना घरी आणण्यासाठी बालचमू नवेकोरे कपडे घालून सकाळपासूनच तयार झाले होते. प्रतिष्ठापनेचा मुहूर्त दुपारी साडेबारापूर्वीचा असल्याने अनेकांनी सकाळीच गणरायाला घरी आणण्यावर भर दिला. बाप्पांना घरी नेत असल्यामुळे आनंदाचे भरते आलेल्या गणेश भक्तांकडून गणपती बाप्पा मोरयाचा गजर होत होता. काहींनी बाप्पांच्या आगमानाचेही “फेसबूक लाइव्ह’ करीत हा आनंद सोहळा टिपून ठेवला. सोसायट्यांनी छोटेखानी मिरवणुका शहरातील विविध भागात रंगल्या होत्या. फुलांच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली. अधून-मधून येणाऱ्या पावसाच्या हलक्या सरींनीही बाप्पांचे स्वागत केले.
घरोघरी तसेच औद्योगिक परिसरातील कारखाने, शहरातील मॉल्स, सिनेमागृह, खासगी कार्यालयांमध्ये विधीवत पूजा करीत गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. अनेकांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळांमध्ये मूर्ती तयार केल्या आहेत. आपण स्वतः तयार केलेल्या गणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा आनंद अनेकांनी घेतला. लहानशी झोपडी, चाळीतील घर ते फ्लॅट, बंगलोमध्ये बाप्पांची स्वारी ऐटीत विराजमान झाली अन् अकरा दिवसांचा मंगलमयी आनंद सोहळा सुरू झाला. बाप्पांचे आगमन झाल्यानंतर महिला वर्गाला गौरीच्या आगमनाचे वेध लागले आहेत. गौराईच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. कोल्हापूर, सांगलीवर ओढावलेल्या पूरसंकटामुळे बहुसंख्य गणेश मंडळांनी साधेपणावर भर दिला आहे. मंदीचा फटका वर्गणीला बसला आहे. त्यामुळे बाप्पांच्या स्वागत मिरवणुकांमध्येही साधेपणा पहायला मिळाला. विघ्नहर्ता मंदीचे संकट दूर करेल या विश्वासाने मंडळांनी व गणेशभक्तांनी बाप्पांचे स्वागत केले