स्थानिकांच्या रोजगारासाठी सुरू झाला लढा
पुणे – अमेरिकेत 1980 च्या दशकात स्थानिकांच्या रोजगारासाठी परकीय नागरिकांच्या तेही भारतीयांच्या विरोधात जास्त सक्रिय असलेल्या डॉट बस्टर गॅंगसारख्याच मानसिकतेत वाढ होताना दिसू लागली आहे. परदेशी नागरिकांना नोकरी देण्यापेक्षा स्थानिकांना प्राधान्य द्या अशी मागणी आता जोर धरत आहे, अशी माहिती अमेरिकेतील एका भारतीय संगणक अभियंत्याने दिली आहे.
सुमारे 30 वर्षांपूर्वी जेव्हा भारतीय लोक अमेरिकेत जाऊ लागले व त्यामुळे रोजगार गमावण्याची वेळ स्थानिकांवर आली त्यावेळी भारतीयांबद्दलचा राग उफाळून आला व अमेरिकेत अनेक शहरांमध्ये या टोळीकडून भारतीयांवर हल्ले सुरू झाले. आज करोनामुळे अमेरिकेत हाहाकार उडाला आहे.
अनेकांचे रोजगारही गेले आहेत. अशा स्थितीत एच-1 बी व्हिसाबाबत पुन्हा एकदा वातावरण तापत असल्याचे समोर येत आहे. अमेरिकेत नोकरी करण्यासाठी या प्रकारचा व्हिसा दिला जातो. हा व्हिसा सरकारने देऊ नये. स्थानिकांचे रोजगार धोक्यात आणू नये अशी मागणी सध्या विविध स्तरांवर केली जात आहे, असेही या अभियंत्याने सांगितले.
करोनामुळे अन्य देशांपेक्षाही जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. लाखो लोकांना बाधा झाली असून लाखभर लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा स्थितीत तेथे अडकलेल्या शेकडो परदेशी नागरिकांनी नोकरीवर पाणी सोडून मायदेशी परतण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, त्यात भारतीयांचे प्रमाणही लक्षणीय आहे.
म्हणून डॉट बस्टर शब्द वापरतात…
भारतीय व्यक्ती आपल्या कुटुंबासह अमेरिकेत 1980 च्या दशकात मोठ्या संख्येने स्थायिक होत होत्या. या कुटुंबातील महिला कपाळावर कुंकु लावत होत्या. या कुंकु किंवा टीकलीला काय म्हणायचे ते अमेरिकन लोकांना माहित नव्हते त्यामुळे ज्या महिलांच्या कपाळावर कुंकु किंवा टीकली दिसली की त्याला डॉट म्हटले जात होते. तसेच भारतीयांच्या विरोधात आक्रमक झालेल्या या टोळीलाच डॉट बस्टर गॅंग असे संबोधले जाऊ लागले. त्या दशकात या गॅंगने शेकडो भारतीयांवर तसेच त्यांचे घर, कार्यालये व हॉटेल्सवर हल्ले केले होते.