पुणे – कुत्र्याने घाण केली म्हणून एकावर कोयत्याने वार करण्यात आले. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी तीघांना अटक केली आहे. निरज उर्फ गुण्या सरोज हिनोटीया (18), ऑगस्टीन अरुणाराज ऍन्थोनी (22 रा. इंदिरावसाहत), निलेश ऍन्थोनी शिंदे (27 रा.कोपरे गाव, ता.हवेली) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी सोमनाथ शंकरलाल मेहतो (38 रा.उत्तमनगर) यांच्या घराशेजारी निरज रहातो. घटनेच्या दिवशी सोमनाथ व त्याचे चुलते घराबाहेर साफसफाई करत होते. यावेळी निरज इतर दोघांना घेऊन तेथे आला. त्याने सोमनाथच्या चुलत्याला तुमचे कुत्रे आमच्या घराबाहेर घाण करते असा जाब विचारला.
यानंतर कोयता काढून चुलत्याच्या अंगावर वार करणार इतक्यात सोमनाथने वार स्वत:च्या हातावर घेतला. यानंतर ऑगस्टीन व नीरज यांनी कोयता काढून सोमनाथला थांब आता तुला ठार मारता असे म्हणत कोयता डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सोमनाथने हा वार चुकवून स्वत:च्या हातावर घेतला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ढेरे करत आहेत.