ट्रस्टीशिपचा सिद्धांत कालसुसंगत

गांधीजींनी 1903 मध्ये त्यांनी ट्रस्टीशिपचा सिद्धांत मांडला होता. भांडवलाचा खरा मालक भांडवलदार नसून, संपूर्ण समाज त्याचा मालक आहे आणि भांडवलदार हा त्याची देखभाल करणारा आहे, हा ट्रस्टीशिपच्या सिद्धांताचा पाया होय. पाश्‍चात्य विलासी जीवनाचे अनुकरण करताना भांडवलदारांमध्ये ऐश्‍वर्याच्या प्रदर्शनाची स्पर्धा लागली आहे. त्याच वेळी पाच टक्के उद्योगपती ट्रस्टीशिपचा सिद्धांत स्वेच्छेने आचरणात आणत आहेत. याचाच अर्थ महात्मा गांधींचा ट्रस्टीशिपचा सिद्धांत कालसुसंगत तर आहेच; शिवाय तो व्यवहार्यही आहे. आधुनिक भारतात हा सिद्धांत कालसुसंगत मानता येऊ शकतो.

गांधीवादाचे चार प्रमुख सिद्धांत मानले जातात. सत्य, अहिंसा, स्वावलंबन आणि ट्रस्टीशिप. गांधीवाद महात्मा गांधींच्या अशा राजकीय आणि सामाजिक तत्त्वांवर आधारित आहे, ज्यांचे अनुकरण सर्वप्रथम स्वतः गांधीजींनी केले आणि नंतरच सिद्धांत म्हणून ही तत्त्वे जगासमोर मांडली. उदाहरणार्थ, सत्याचे प्रयोग हे गांधीजींचे आत्मचरित्र 1927 मध्ये प्रकाशित झाले होते. स्वातंत्र्यलढ्यात अहिंसक सत्याग्रहाचा मार्ग ब्रिटिशांविरुद्ध शस्त्र म्हणून त्यांनी वापरला. त्यामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले. अहिंसेबरोबरच स्वावलंबनाचा प्रयोगही गांधीजींनी स्वतःवर केला. त्यानंतर त्यांनी स्वावलंबी ग्रामजीवन आणि ग्रामस्वराज्य या संकल्पना मांडल्या. चरखा, टकळी आणि खादी ही स्वावलंबनाची प्रतीके बनली. शिक्षण युवकांना स्वावलंबी बनविणारे असायला हवे, अशी गांधीजींची धारणा होती. त्यामुळेच त्यांनी मूलभूत शिक्षणावर भर दिला. गांधीवादाचा चौथा स्तंभ अर्थातच ट्रस्टीशिप हा आहे. त्याविषयी फारच कमी लेखन झाले आहे. सध्याच्या भारतासंदर्भात या सिद्धांताच्या सर्वकालीनतेविषयी चर्चा आवश्‍यक आहे.

“गांधीवादी अर्थशास्त्र’ या शब्दाचा वापर सर्वप्रथम त्यांचे अनुयायी अर्थतज्ज्ञ जे. सी. कुमारप्पा यांनी केला होता. त्यांच्या मते गांधीजींचे अर्थशास्त्र हे अशा समाजव्यवस्थेचे संकल्पचित्र आहे, जिथे वर्गभेदाला स्थान नाही. गांधीजींचे अर्थशास्त्र सामाजिक न्याय आणि समतेच्या तत्त्वांवर आधारित आहे. गांधीवादी अर्थशास्त्राचे प्रणेते जे. सी. कुमारप्पा यांनी मद्रासमधून पदवी प्राप्त केली आणि नंतर इंग्लंड आणि अमेरिकेत अर्थशास्त्राचे उच्चशिक्षण घेतले. शिकत असताना त्यांनी एक प्रबंध लिहिला होता आणि भारतातील गरिबीचे प्रमुख कारण इंग्रज राज्यकर्त्यांचे शोषणवादी धोरण हेच आहे असे पुराव्यांनिशी सिद्ध केले होते. कुमारप्पा यांनी आपली सर्व पुस्तके आणि निबंध स्वतः लोकांमध्ये जाऊन केलेल्या अभ्यासाच्या आधारे लिहिली, हे त्यांचे वैशिष्ट्य होय. “यंग इंडिया’च्या संपादक मंडळात त्यांनी गांधीजींचे सहकारी म्हणून काम केले होते.

गांधीजी जेव्हा दक्षिण आफ्रिकेत होते तेव्हा 1903 मध्ये त्यांनी ट्रस्टीशिपचा सिद्धांत मांडला होता. भांडवलाचा खरा मालक भांडवलदार नसून, संपूर्ण समाज त्याचा मालक आहे आणि भांडवलदार हा त्याची देखभाल करणारा आहे, हा ट्रस्टीशिपच्या सिद्धांताचा पाया होय. भांडवल हे भांडवलदाराकडे असलेली समाजाची ठेव आहे, असे मानणाऱ्या गांधीजींनी भांडवलामुळेच जगभरातील बेरोजगारी वाढली असल्याचे आणि श्रमाची प्रतिष्ठा घटली असल्याचे प्रतिपादन केले होते. बेरोजगारीने समाजातील सर्वांत लहान घटकाला कमकुवत केले आहे. श्रीमंतांनी आपल्या संपत्तीचा स्वेच्छेने त्याग केला नाही, सर्वसामान्य जनतेला त्यातील भागीदार बनविले नाही, तर एके दिवशी हिंसक आणि रक्तरंजित क्रांती होईल. या सर्व समस्यांवर उत्तर म्हणून गांधीजींनी ट्रस्टीशिपचा सिद्धांत मांडला.

ट्रस्टीशिपच्या सिद्धांतानुसार, जी व्यक्ती आपल्या गरजेपेक्षा अधिक संपत्ती जमा करते त्या व्यक्तीला केवळ आपल्या आवश्‍यकता पूर्ण होतील एवढीच संपत्ती वापरण्याचा अधिकार आहे. उर्वरित संपत्तीचे व्यवस्थापन त्याने एक ट्रस्टी म्हणून करणे आणि तिचा समाजकल्याणासाठी उपयोग करणे आवश्‍यक आहे. गांधीजी असे सांगत की, सर्वच लोकांची क्षमता एकसारखी नसते. कमावण्याची क्षमताही वेगवेगळ्या व्यक्तींची कमी-अधिक असते. त्यामुळे ज्यांच्याकडे अधिक कमावण्याची क्षमता आहे, त्यांनी अधिक कमावलेच पाहिजे; परंतु आपल्या गरजा पूर्ण होतील तेवढाच भाग वापरला पाहिजे. उर्वरित संपत्ती त्याने समाजकल्याणावर खर्च केली पाहिजे. महात्मा गांधींच्या मते, भांडवलदार आणि अधिक उत्पन्न असलेल्या लोकांनी आपल्या गरजाही मर्यादित केल्या पाहिजेत. तरच उर्वरित संपत्ती गरजवंतांसाठी खर्च करणे शक्‍य होईल.

महात्मा गांधींच्या ट्रस्टीशिपच्या सिद्धांताला बुद्धीजीवी वर्गातील एका मोठ्या समूहाने काल्पनिक आदर्शवाद मानले आणि अव्यावहारिक घोषित करून टाकले. अनेकांनी त्यांच्या ट्रस्टीशिपच्या सिद्धांताची खिल्लीही उडविली; परंतु गांधीजींना त्यांच्या ट्रस्टीशिपच्या सिद्धांतावर पूर्ण विश्‍वास होता. त्यामुळेच हा सिद्धांत समजावून सांगण्यासाठी त्यांनी भांडवलदारांच्या आणि श्रीमंत व्यक्तींच्या बैठका घ्यायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर त्यांची समजूत घालून या सिद्धांताचे पालन करण्यास राजी करण्यात यश मिळविले. महात्मा गांधींच्या ट्रस्टीशिप सिद्धांताशी सहमत असलेल्या शेकडो उद्योगपतींनी चॅरिटेबल ट्रस्ट, फाउंडेशन स्थापन केले आणि असंख्य शिक्षणसंस्था, दवाखाने, तलाव आदींची निर्मिती केली. ट्रस्टीशिप सिद्धांताचे पालन करणाऱ्या शेकडो उद्योगपतींमध्ये ज्यांनी आपल्या कुटुंबीयांसह अत्यंत साधेपणाची जीवनशैली स्वीकारली ते जमनालाल बजाज हे महात्मा गांधींचे सर्वांत प्रिय उद्योगपती शिष्य मानले जातात. दुसरीकडे, जमशेदजी टाटा यांनी 1903 च्या पूर्वीच म्हणजे ट्रस्टीशिपचा सिद्धांत मांडला जाण्यापूर्वीच तो व्यवहारात आणला होता.

आधुनिक भारतातील बडेबडे उद्योगपती आपल्या संपत्तीचे सातत्याने प्रदर्शन घडवीत असतात, एवढेच नव्हे तर माध्यमांचा वापर करून त्याचा प्रचारही जोरदार करीत असतात. अशा स्थितीत ट्रस्टीशिप सिद्धांत कालसुसंगत मानता येईल का, असा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे. सध्याचे उद्योजक हे कॉर्पोरेट उद्योजक बनले आहेत आणि सामाजिक कामातील त्यांचा सहभाग हा कॉर्पोरेट कर वाचविण्यासाठीच असतो. तरीही या देशात अनेक असे उद्योजक आहेत, ज्यांना महात्मा गांधींना भेटण्याची संधी मिळाली नाही; परंतु ते चॅरिटेबल ट्रस्ट, फाउंडेशन स्थापन करून आपल्या संपत्तीमधील मोठा हिस्सा शिक्षण, आरोग्य, देशी खेळांचा विकास आणि लोककल्याणाच्या इतर कार्यांमध्ये खर्च करतात. या सिद्धांताची कालसुसंगतता दाखवून देण्यासाठी ताजे उदाहरण सांगणे क्रमप्राप्त आहे. ट्रस्टीशिपचा सिद्धांत अंमलात आणणाऱ्यांमध्ये विप्रो या आयटी कंपनीचे प्रमुख अझीम प्रेमजी यांचा प्रामुख्याने समावेश होतो. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपली 53 हजार कोटी रुपये मूल्याची मालमत्ता अझीम प्रेमजी ट्रस्टला दान केली. देशातील सहा राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील शिक्षकांची क्षमता वाढविण्यासाठी हा ट्रस्ट महत्त्वाचे काम करीत आहे. पाश्‍चात्य विलासी जीवनाचे अनुकरण करताना भांडवलदारांमध्ये ऐश्‍वर्याच्या प्रदर्शनाची स्पर्धा लागली आहे. त्याच वेळी पाच टक्के उद्योगपती ट्रस्टीशिपचा सिद्धांत स्वेच्छेने आचरणात आणत आहेत. याचाच अर्थ महात्मा गांधींचा ट्रस्टीशिपचा सिद्धांत कालसुसंगत तर आहेच; शिवाय तो व्यवहार्यही आहे. आधुनिक भारतात हा सिद्धांत कालसुसंगत मानता येऊ शकतो.

डॉ. हनुमंत यादव
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.