पारनेर – शाळा सुटल्यानंतर घरी येताना योगेश रामा फुलमाळी (वय 8, रा. धानोरा, ता. आष्टी, जि. बीड) या विद्यार्थ्याचा अपघात झाला होता. त्याला खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोमात गेलेला विद्यार्थी कुठल्याही प्रकारे प्रतिसाद देत नव्हता. डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतरही आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या योगेशचे निधन झाले.
योगेशची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडील मोलमजुरी करून आपले कुटुंब चालवत असताना चिमुकल्या योगेशचा अपघात झाला. त्याचा रोजचा खर्च 15 हजार रुपये होता. उपचाराचा खर्च कुठून करायचा ही गोष्ट त्यांनी औटी यांना सांगितली. औटी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष रविश रासकर यांना ही बाब सांगितली. त्यानंतर रासकर यांनी दवाखान्यात जाऊन अपघात झालेल्या विद्यार्थी योगेशची परिस्तिथी पाहून त्याच्या नातेवाईकांशी चर्चा केली. सोशल मीडियावर सर्वांना मदतीचे आवाहन केले. योगेशच्या उपचारासाठी सुमारे 1 लाखाच्या आसपास मदत गोळा झाली.
मुलाच्या वडिलांकडे रविश रासकर यांनी ही रक्कम सुपुर्द केली होती. मात्र, नियतीने काही वेगळेच लिहिले होते. कोमात गेलेला विद्यार्थी कुठल्याही प्रकारे प्रतिसाद देत नव्हता. डॉक्टरांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू होती. नातेवाईकांसह अनेकांनी योगेश वाचावा म्हणून देवाकडे प्रार्थना केली. अखेर या चिमुकल्याचे बुधवारी दुपारी निधन झाले. त्याच्या या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.