पुणे – डॉक्टर महिलेला व्हिडीओ व फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत 40 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. याप्रकरणी कर्वेनगर येथील एका 27 वर्षीय डॉक्टर महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईलधारक व्यक्तीच्या विरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2019 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टर तरुणी व आरोपीची ओळख फेसबुकद्वारे झाली होती. मैत्री वाढत गेल्यानतंर दोघे मोबाईलवरील व्हॉट्सअप मेसेजद्वारे संभाषण करत होते.
दरम्यान, फिर्यादी तरुणीच्या मोबाईलचा डिस्प्ले खराब झाल्याने अनावधानाने तिच्या मोबाईलमधून खासगी व्हिडीओ व फोटो आरोपीच्या मोबाईलवर सेंन्ड झाले. याच संधीचा फायदा घेत खासगी व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने डॉक्टर तरुणीकडे 40 हजाराच्या खंडणीची मागणी केली. याप्रकरणाचा पुढील तपास वारजे माळवाडी पोलिस करत आहेत.