नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सगळेच रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. देशात मागील २४ तासात बाधितांचा आकडा तब्बल ४ लाखांवर पोहोचला आहे. जगात आतापर्यंत कोणत्याच देशात एकाच दिवसात ४ लाख रुग्णांची नोंद एकाच दिवशी झालेली नाही. कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने देशातील आरोग्य यंत्रणेवर खूप मोठा ताण आहे. कामाचा ताण असह्य झाल्याने दिल्लीतल्या एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरने आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
डॉ. विकास राय असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. ते महिनाभरापासून आयसीयूमध्ये कार्यरत होते. ते मूळचे उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरचे रहिवासी होते. गेल्या महिनाभरापासून डॉ.राय यांची ड्युटी आयसीयूमध्ये लावण्यात आली होती, असे सांगण्यात येत आहे. राय दररोज सात ते आठ रुग्णांना सीपीआर देत होते. मात्र त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही अनेकजण वाचू शकले नाहीत. या परिस्थितीमुळे राय यांच्यावर ताण आला. त्यांनी ही गोष्ट मनाला खूप लावून घेतली होती, असेही म्हटले जात आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना योद्धा म्हणून काम करताना डॉ. राय यांनी शेकडो रुग्णांचे प्राण वाचवले, असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. गेल्या नोव्हेंबरमध्येच राय विवाह बंधनात अडकले. त्यांची पत्नी दोन महिन्यांची गर्भवती आहे. डॉ.राय यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नवी दिल्लीतल्या एम्समध्ये आणण्यात आला.
कोरोना संकटात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर किती ताण आहे हेच या दुर्दैवी घटनेतून अधोरेखित झाल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडेकर यांनी म्हटले आहे. या अभूतपूर्व परिस्थितीमुळे डॉक्टरांवर असलेला मानसिक ताण खूप मोठा आहे. कोरोना संकटाशी आघाडीवर राहून दोन हात करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाच आरोग्य सुविधा मिळत नसल्याचे चित्र देशभरात दिसत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.