पिंपरी – दिवाळीमुळे सलग सुट्ट्या असल्याने औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या बंद आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पांमधील उत्पादन बंद आहे. त्यामुळे करोनानंतर सहा महिन्यांनंतर गजबजलेल्या औद्योगिक वसाहतींमधील वर्दळ थंडावली असून, या वसाहतींमध्ये दोन दिवसांपासून शुकशुकाट दिसत आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीमध्ये सात हजार लहान-मोठे उद्योग आहेत. यापैकी बहुराष्ट्रीय उद्योगांची संख्या दीडशेच्या आसपास आहे. या सर्व कंपन्यांना दिवाळीची किमान तीन दिवस तर जास्तीतजास्त सात दिवस सुट्ट्या आहेत. त्यामुळे कामगार आपल्या कुटुंबीयांसमवेत दिवाळीचा आनंद लुटत आहेत. तर उपादन प्रकल्प बंद असल्याने यामधील यंत्र व मशिनरींचा दणदणाट आता थंडावला आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली सहा महिने औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या बंद होत्या. खबरदारीचे नियम पाळण्याच्या अटींवर सप्टेंबर महिन्यात उद्योगांना उत्पादन घेण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर उद्योगांचे मंदावलेले अर्थकारण हळूहळू जोर धरू लागले. त्यानंतर दसऱ्याच्या आदल्यादिवशी उद्योगांमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या खंडेनवमीला उद्योगांचे अर्थकारण हळूहळू सुधारत असल्याचे दिसून आले.
बहुतांशी उद्योगांमध्ये समाधानकारक बोनस देण्यात आल्याने, कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. त्यामुळे शहरातील बाजारपेठ गजबजली होती. परिणामी शहराच्या अर्थकारणाला मोठी गती मिळाल्याचे चित्र उद्योगनगरीत पहायला मिळाले.
दरवर्षी कामगारांना दिवाळीचा आनंद घेता यावा, याकरिता उद्योगांनी आपल्या धोरणानुसार कामगारांना सुट्ट्या दिल्या आहेत. सहा महिन्यांच्या लॉकडाऊननंतर उद्योगांमधील कामगारांना या सुट्ट्या रिफ्रेश होण्यास मदत होत आहे.
– यशवंत भोसले, अध्यक्ष, रा. श्र. आघाडी