जिल्हा तापला…पाऱ्याने गाठली चाळीशी

अकरा वाजल्यापासून रस्त्यांवर शुकशुकाट
आईस्क्रीम पार्लरसह रसवंती गृहांमध्ये गर्दी

सातारा  – साताऱ्यात मंगळवारी उन्हाचा पारा तब्बल 40 अंशावर पोहचला. त्यामुळे नागरिक उकाड्याने चांगलेच हैराण झाले. त्यातच मंगळवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही झाली. तसेच वाढत्या तापमानामुळे रस्त्यांवर शुकशुकाट निर्माण झाला होता. तज्ञांच्या मते आणखी दिवस तरी तापमानाचा पारा सरासरी 35 अंशाच्या आसपास राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रकृतीची काळजी घेण्याच्या दृष्टीने सतर्क राहणे आवश्‍यक आहे.

दरम्यान, मंगळवारी तापमानाचा पारा चांगलाच वाढल्यामुळे नागरिक घामाघूम होताना दिसून आले. त्यात दर मंगळवारी थोड्या कालावधी करिता वीजपुरवठा खंडित केला जातो. मात्र, यंदा पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर उपकरण दुरुस्ती व झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी दिवसभर वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण दिवस फॅन व कुलर शिवाय काढण्याची वेळ सातारकरांवर आली. काही नागरिकांनी घरासमोरील तसेच परिसरातील झाडाखाली विश्रांती घेण्याचा पर्याय निवडला. तर लहान मुलांनी परिसरातील विहीर, नाले व स्विमिंग टॅंकमध्ये पोहण्याचा आनंद लूटला. दुसऱ्या बाजूला उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट निर्माण झाला होता. बाजारपेठ आणि एस.टी.स्टॅंड परिसरात देखील नागरिकांची वर्दळ कमी झाली होती.

आठवडाभरापासून सूर्यनारायण आग ओकायला लागले आहेत. उन्हाच्या चटक्‍यापासून बचाव करण्यासाठी मिळेल त्या वस्तूंचा आधार घ्यावा लागत आहे. जिल्ह्यातील सर्वच तू तीव्र स्वरूपाचे असतात. सर्वसाधारणपणे मे महिन्यातील उन्हाळा असह्य असतो. मात्र, परिसरातील डोंगरी प्रदेश, वनसंपदा असल्याने गार झुळूक येत असते. त्यामुळे कडक उन्हातही फारसा फरक पडत नाही. यंदा मात्र, एप्रिल महिन्यापासून उन्हाचा पाऱ्याने उसळी मारली आहे.

कडक उन्हामुळे सावलीत बसले तरी उन्हाच्या झळा बसत आहेत. यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे उष्माघातासारख्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या रुग्णालयांमध्ये वाढत आहे. कडाक्‍याच्या उन्हामुळे त्रासलेल्या जीवाला शांत करण्यासाठी शहरातील रसवंतीगृह, आईस्क्रिम पार्लरमध्ये गर्दी होऊ लागली आहे. तसेच माठातील पाणी, फ्रीजमधील पाण्याचा वापर केला जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.