सातारा – जिल्हा रुग्णालयात पंधरा बेडचा समावेश असणाऱ्या तिसऱ्या अतिदक्षता विभागाची उभारणी सुरु झाली आहे. या उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून विशेष निधी उपलब्ध केला जाणार आहे. याशिवाय 13 हजार किलोलीटरचे ऑक्सिजन युनिट उभे केले जात असून सेंट्रल लाईनसाठी 80 ड्युरा सिलिंडर जोडण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दर्जेदार सुविधा देण्याची आरोग्य यंत्रणेची धडपड सुरु आहे. रुग्णालयातील नेत्र विभागालगतच्या दालनात पंधरा बेडचा तिसरा अतिदक्षता विभाग उभारला जात असून येत्या सात दिवसांत तो पूर्ण करणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी “प्रभात’ला सांगितले. या अतिदक्षता विभागात दहा ऑक्सिजन बेड व पाच व्हेंटिलेटर बेड असणार आहेत.
या अतिदक्षता विभागाच्या उभारणीमुळे जिल्हा रुग्णालयातील कोविड खाटांची संख्या 143 होणार आहे.
याशिवाय रुग्णालयाच्या तिन्ही अतिदक्षता विभागांना पुरेशा दाबाने ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी 13 हजार किलोलीटर क्षमतेचे स्वतंत्र युनिट उभारण्याचे काम स्वतंत्रपणे सुरु झाले आहे. या युनिटसाठी स्वतंत्र ऑक्सिजन लाइन टाकण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्या वतीने जीव्हीएस कंपनीला देण्यात आले आहे. या कामाची अंदाजपत्रकीय किंमत साधारण 90 लाख रुपयांच्या घरात असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. हा निधी जिल्हा नियोजन समतिीतून देण्याची तयारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दर्शवली आहे.
या युनिटची वेळेत उभारणी झाल्यास जिल्हा रुग्णालयाच्या ऑक्सिजन टंचाईचा प्रश्न मिटणार आहे. यातील महत्वाची अडचण आहे ती मनुष्यबळाची. पंधरा परिचारिका व तीन डॉक्टरांची तातडीने गरज आहे. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेवरील केवळ 11 डॉक्टर काम करत आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सकांसह प्रशासन अधिकारी व आरएमओ ही महत्वाची पदे रिक्त असल्याने महत्वाच्या कामांची अडचण होत आहे. सततच्या ताणांमुळे वाढीव कामांच्या जवाबदाऱ्या झटकण्याचे काम सुरु झाल्याने जिल्हा रुग्णालयाचे सांघिक काम होईनासे झाले आहे. अगदी दैनंदिन कोविड वॉर्डात होणाऱ्या राउंडच्या प्रश्नावरून सातत्याने वादावादी होत असल्याची माहिती प्रशासनातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यांने दिली.
आरोग्य व्यवस्थेची डागडुजी करणे ही डॉ सुभाष चव्हाण यांच्यासाठी अडथळ्यांची शर्यत ठरली आहे. तरीही नव्या अतिदक्षता विभागासाठी नर्स व डॉक्टरांच्या व्यवस्थेबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले .
बेडच्या काळा बाजारप्रकरणी कारवाई करणार
जिल्हा रुग्णालयात बेडचा काळाबाजार करणाऱ्या टोळीची बातमी “प्रभात’ने गुरुवार च्या अंकात प्रसिद्ध केली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी स्पष्ट केले.