जिल्ह्यात 5 हजार 795 सैनिक मतदार

“ईटीपीबीएस’द्वारे बजावणार मतदानाचा हक्‍क

पुणे – देशभर कर्तव्य बजावत असणाऱ्या सैनिकांसाठी विधानसभा निवडणुकीत ऑनलाइन मतपत्रिकेचा वापर केला जाणार आहे. टपाली मतदान प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि मतपत्रिका वेळेत मिळावी यासाठी इलेक्‍ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम (ईटीपीबीएस)च्या माध्यमातून सैनिकांना ऑनलाइन मतपत्रिका पाठविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात 5 हजार 795 सैनिक मतदार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय निवडणूक निरीक्षक संतोष कुमार यादव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, टपाली मतप्रक्रिया समन्वय अधिकारी सुनील गाढे तसेच संबंधित विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत ईटीपीबीएस’द्वारे सैनिकांना ऑनलाइन मतपत्रिका पाठविण्यात आली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सैनिकांना मतदानाचा हक्‍क बजावता यावा यासाठी सी-डॅक’च्या मदतीने इलेक्‍ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम (ईटीपीबीएस) ही प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे सैनिकांना ऑनलाइन मतपत्रिका पाठवली जाणार आहे.

सैनिकांनी या इलेक्‍ट्रॉनिक मतपत्रिकेचे प्रिंट काढून मतदान करून ती मतपत्रिका पुन्हा पोष्टाद्वारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवायची आहे. यामुळे पोस्टल मतपत्रिका सैनिकांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी वाचणार आहे व सैनिकांची मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे वेळेत पोहोचणार आहे. या प्रणालीमुळे 100 टक्‍के नोंदणी झालेल्या सैनिक मतदारांपर्यंत मतपत्रिका पोहोचणार आहे.

तसेच, यापूर्वी सैनिक मतदारांचे मतदान जे 10 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असायचे ते या प्रणालीमुळे वाढले असून गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ते सुमारे 60 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. विधानसभेच्या निवडणुकीत 70 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मतदानाचा एकूण टक्‍का वाढण्यास निश्‍चितपणे मदत होणार असल्याचा विश्‍वास जिल्हा प्रशासनाकडून व्यक्‍त करण्यात आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)