जिल्ह्यात 65 टक्‍क्‍यांहून अधिक मतदानाचा अंदाज

सातारा  – सातारा जिल्ह्यात लोकसभेची पोटनिवडणूक आणि आठ विधानसभा मतदारसंघासाठी आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 60.99 टक्के मतदान झाले.ईव्हीएम मशीनमध्ये किरकोळ झालेले तांत्रिक बिघाड वगळता सातारा जिल्हयात शांततेने मतदान पार पडले. पाच वाजेपर्यंत 15 लाख 38 हजार मतदारांनी आपला हक्क बजावला. नंतरचे एक तासाचे मतदान समजू शकले नव्हते. काही मतदान केंद्रांवर उशीरापर्यंत मतदान सुरू होते. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्‍यता असून सुमारे 65 टक्‍क्‍यांहून अधिक मतदान होईल, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. दरम्यान, लोकशाहीच्या या उत्सवादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

जावळी व पाटण तालुक्‍यांतील दुर्गम भागातील मतदान केंद्र तसेच खंडाळा तालुक्‍यात काही मतदान केंद्रांवर सहा वाजल्यानंतरही मतदान प्रक्रिया सुरूच होती. त्यामुळे मतदानाची निश्‍चित टक्केवारी समजू शकली नाही. मतदानाचा टक्का गतवर्षीच्या तुलनेत वाढल्याने राजकीय धाकधुक मात्र वाढली आहे. सातारा जिल्ह्यात दुपारी एक वाजेपर्यंत 25.61 टक्के मतदान झाले होते. पावसाने उघडीप दिल्यामुळे बहुतांश नागरिकांनी सकाळीच मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. सातारा येथे राजमाता कल्पनाराजे भोसले, उदयनराजे भोसले, दमयंतीराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले आणि दीपक पवार यांनी आपल्या मतदानाचा  हक्क बजावला.

सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसह जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक झाली. उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी, संपर्क दौरा, पदयात्रा कोपरा सभा घेऊन आपापल्या भूमिका जाहीर केल्या होत्या. या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शहा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खा. अमोल कोल्हे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, अमोल मेटकरी यांच्या जाहीर सभा झाल्यामुळे प्रचारात मोठी रंगत येण्याबरोबरच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या.

मतदानाला दोन दिवस बाकी असतानाच सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने कहर केल्यामुळे त्याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असतानाच सोमवारी पहाटेपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे मतदान करण्यासाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. मतदानासाठी सातारा जिल्ह्यात 2978 मतदान केंद्रे होती. त्यासाठी 22 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आज सकाळी सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे राजमाता कल्पनाराजे भोसले, दमयंतीराजे भोसले यांनी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचे औक्षण केले.

उदयनराजे यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत अनंत इंग्लिश स्कूल येथे मतदानाचा हक्क बजावला. आपआपल्या उमेदवारांना अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे, त्यांना मतदान स्लिप देणे, वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणे या कामात कार्यकर्ते दिवसभर व्यस्त होते. प्रशासनाच्या वतीने दिव्यांग, गर्भवती महिलांना मतदान करण्यासाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.
पावसाने उघडीप दिल्यामुळे सकाळी मतदान केंद्रांवर मतदानासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. जिल्ह्यामध्ये दुपारी एक वाजेपर्यंत 25.61 तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत 60.99 टक्के मतदान झाले. माण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले.

वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण व सातारा यी लोकसभेअंतर्गत सहा मतदारसंघातून 11 लाख 44 हजार 553 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 61.85 टक्के नागरिकांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले. फलटण व माण मतदारसंघातून 3 लाख 93 हजार 750 मतदारांनी मतदान (58.60 टक्के) केले . एकूण 15 लाख 38 हजार 303 मतदारांनी लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्सवात भाग घेतला. पाच वाजता सर्वाधिक मतदान वाई तालुक्‍यात (2 लाख 4 हजार 72,) त्याखालोखाल मतदान माण तालुक्‍यात (1 लाख 98 हजार 970) झाले असून साताऱ्यात सर्वात कमी 1 लाख 85 हजार 382 एवढे मतदान झाले आहे.

खंडाळ्यात अंदोरी, अहेरी या भागात मतदान केंद्रांवर गर्दी वाढल्याने सायंकाळी सहाच्या नंतरही मतदान सुरू होते. कांदाटी खोरे तसेच पाटण तालुक्‍याच्या दुर्गम भागातील मतदानाची आकडेवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली नाही. माण तालुक्‍यात चार केंद्रावर ईव्हीएम मशीनची प्रोसेसिंग स्लो झाल्याच्या तक्रारी होत्या. सातारा तालुक्‍यात सायगाव व आनेवाडी मतदान केंद्रावर काही काळ मशीन बंद पडल्याचे प्रकार घडले. दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्हयात 28 टक्के, चार वाजेपर्यंत 49 तर पाच वाजेपर्यत एकसष्ट टक्के मतदान झाले. दुपारी चार ते सहा या दोन तासांत मतदानाची टक्केवारी शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातून वाढली.

मतदारसंघनिहाय झालेले एकूण मतदान पुढीलप्रमाणे (सायंकाळी पाच वाजेपर्यंतची आकडेवारी)- वाई -204072, कोरेगाव- 189329, कराड उत्तर- 185804, कराड दक्षिण- 188465, पाटण – 191501, सातारा- 185382, फलटण -194780 माण-198970. एकूण मतदान -11538303. टक्केवारी -60.99 टक्के

लोकांनी निर्णय घेतला आहे : उदयनराजे भोसले
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उदयनराजे भोसले म्हणाले, “”मी आणि सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे सर्व उमेदवार विजयी झालेले आहेत.
हे मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये सांगतोय, असे नव्हे तर गोपनीय अहवालही तसेच आहेत. विचार करूनच लोकांनीच आता निर्णय घेतला आहे, असेही उदयनराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.

मतदार मला पुन्हा निवडून देतील : शिवेंद्रसिंहराजे भोसले
सुरूची या निवासस्थानी सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी औक्षण केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे आपल्या कुटुंबासमवेत मतदान केंद्रावर गेले. तेथे रांगेत उभे राहून त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामामुळे मतदारसंघांमध्ये उत्साह आहे. मीही माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये कामे केली आहेत, त्याचा या निवडणुकीत निश्‍चित फायदा होईल.’ सातारा शहर व विधानसभा मतदारसंघातील लोक मला पुन्हा निवडून देतील, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.