करंजे एमआयडीसीत उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांचा त्रास

सातारा – सातारा आकाशवाणी केंद्रासमोरील करंजे येथील लघुउद्योजकांना उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरातील लोकांना शौचालय बांधून देऊन त्याचा वापर करण्यास प्रवृत्त करावे असे गाऱ्हाणे प्लॉट धारक संघटनेचे अध्यक्ष मनोजकुमार तपासे यांनी पालिकेसह सातारा जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनासमोर मांडले आहे.

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत व पालिका मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, करंजे औद्योगिक वसाहतीत प्लॉट क्रं 46 ते 50 हे आकाशवाणी केंद्राच्या समोर येतात. येथे बेकरी, पॅकिंग बॉक्‍स गॅस एजन्सी असे छोटे मोठे व्यवसाय चालतात. हे प्लॉट माजगावकर माळ झोपडपट्टीलगत असल्याने रात्री उशिरा व पहाटे येथील स्त्री पुरुष शौचालयाची सोय नसल्याने उघड्यावर शौचाला बसतात.

सकाळी कामावर येताना प्लॉट धारकांना प्रचंड अवघडल्यासारखे होते आणि दुर्गंधीचा त्रास होतो. या प्रकरणी तक्रार केल्यास अर्वाच्य भाषेत आमच्याशी हुज्जत घालून कायद्याचा दुरुपयोग केला जाईल, अशी भाषा वापरली जाते. शाहूपुरी पोलीस ठाण्याला या प्रकरणा संदर्भात तक्रार अर्ज करण्यात आला आहे. नगरपालिकेने या लोकांना सदर जागेत शौचालय बांधून द्यावीत, अशी मागणी प्लॉट धारक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.