नीरा कालव्यावरून सुरू असलेली चर्चा अनाठायी

पुणे – आधीच्या सरकारने नीरा उजव्या कालव्याची प्रलंबित कामे पूर्ण केली नाहीत. मात्र, आम्ही 97 किलोमीटरचे कामे लवकर पूर्ण करू. त्यामुळे सध्या नीरा कालव्यावरून सुरू असलेली चर्चा अनाठायी असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.

बारामती-इंदापूरपर्यंत जाणारा नीरा डावा कालवा 88 आणि सोलापूरकडे जाणारा उजवा कालवा 208 किलोमीटरचा आहे. सोलापूरकडे जाणाऱ्या 65 किलोमीटर लांबीच्या कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. नुकतेच राज्य सरकारने युतीसरकारने जून-2019 रोजी घेतलेला पाणी वाटपाचा निर्णय रद्द करून सुधारित निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार बारामती-इंदापूरकडे जाणाऱ्या डाव्या कालव्याला कपात केलेले 4 अब्ज घनफूट पाणी मिळणार आहे. या पाण्यावरुन सोलापूर आणि बारामती, असा वाद रंगणार आहे.

सिंचन भवन येथे आढावा बैठकीसाठी आलेल्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना त्याबाबत विचारले असता, ते म्हणाले, कृष्णा खोऱ्यातील रखडलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठीच मी आलो आहे. उजव्या कालव्याचे रखडलेले 97 किलोमीटरचे काम कसे करता येईल, त्यावर आम्ही चर्चा करणार आहोत. खरेतर आधीच्या सरकारने हे काम करायला हवे होते. मात्र, त्यांनी ते केले नाही. आता कालव्यावरून होत असलेली चर्चा अनाठायी आहे.

पुणे शहराला भामा-आसखेड धरणातून पाणी देण्याबाबत राबविण्यात येणारी, खडकवासला धरणातून प्रस्तावित असलेली भूमिगत जलवाहिनी या प्रश्‍नांवर त्यांनी बोलणे टाळले. त्यावर अभ्यास करून भूमिका मांडेन, असे पाटील यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.