लॉटरी किंगच्या ठिकाणांवरील छाप्यांतून 595 कोटींचे बेहिशेबी उत्पन्न उघड

मोठ्या प्रमाणात रोकड, सोने-हिऱ्यांचे दागिने जप्त
चेन्नई – लॉटरी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तामीळनाडूस्थित मार्टीन सॅंटीआगो याच्याशी संबंधित देशभरातील 70 ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. त्या कारवाईवेळी 595 कोटी रूपयांचे बेहिशेबी उत्पन्न उघड झाले. त्याशिवाय, रोकड आणि सोने-हिऱ्यांचे दागिने मिळून कोट्यवधींचा ऐवज जप्त करण्यात आला.

प्राप्तिकर विभागाने 30 एप्रिलपासून लॉटरी किंगला लक्ष्य करून छापासत्र सुरू केले. तामीळनाडूच्या कोईमतूर, चेन्नईबरोबरच मुंबई, दिल्ली, कोलकता, हैदराबाद, गुवाहाटी, सिलिगुडी, गंगटोक, रांची आणि लुधियानात छापे टाकण्यात आले. त्या कारवाईवेळी 8 कोटी 25 लाख रूपयांची बेहिशेबी रोकड आढळली. त्याशिवाय, सुमारे 25 कोटी रूपयांचे बेहिशेबी सोने-हिऱ्यांचे दागिनेही आढळले. मार्टीनचा कोईमतूरस्थित ग्रुप लॉटरी व्यवसाय चालवतो. त्या ग्रुपचे पश्‍चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये वर्चस्व आहे. त्याशिवाय, तो ग्रुप रिअल इस्टेट आणि अर्थपुरवठा क्षेत्रांतही सक्रिय आहे. दरम्यान, मार्टीनच्या ग्रुपमध्ये काम करणारी एक 45 वर्षीय व्यक्ती शुक्रवारी कोईमतूर जिल्ह्यात मृतावस्थेत आढळली. त्यामुळे त्या ग्रुपभोवतीचे संशयाचे धुके आणखी गडद झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.