वंचित आघाडीचा कॉंग्रेसला किमान नऊ जागांवर फटका

मुंबई: महाराष्ट्रात सर्व 48 जागांवर उमेदवार उभ्या करणाऱ्या वंचित आघाडीने महाराष्ट्रात किमान नऊ मतदार संघात कॉंग्रेस उमेदवारांचा विजयाचा मार्ग रोखून धरल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या मतदार संघांमध्ये ज्या फरकाने कॉंग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत त्यापेक्षा अधिक मते तेथील वंचित आघाडीच्या उमेदवारांनी घेतली आहेत असे यातून दिसते आहे.

बीड, बुलढाणा, गडचिरोली चिमुर, नांदेड, परभणी, हातकणंगले, सांगली, सोलापुर, यवतमाळ वाशिम अशा मतदार संघांमध्ये वंचितने घेतलेल्या मतांमुळेच कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांना पराभवाच्या फटका सहन करावा लागला आहे. महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री वंचित आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे विजयापासून वंचित राहिले आहेत. त्यात सर्वात मोठे उदाहरण सोलापुरचे आहे. तेथील मतांच्या आकडेवारी नुसार भाजपचे विजयी उमेदवार सिद्धेश्‍वर स्वामी यांना 524985, सुशिलकुमार शिंदे यांना 366377 आणि वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना 170007 मते पडली. या मतविभागणीचा मोठा फटका सहाजिकच शिंदे यांना बसला आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. कॉंग्रेसचे आणखी एक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही या मतविभागणीचा फटका बसला आहे. नांदेड मधील भाजपचे विजयी उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांना 4 लाख 86 हजार 806 मते मिळाली. अशोक चव्हाण यांना 4 लाख 46 हजार 658 तर वंचित आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांनी तब्बल 1 लाख 66 हजार 196 मते घेतली आहेत.

बीडमध्ये भाजपच्या प्रितम मुंडे आणि कॉंग्रेसचे बजरंग सोनावणे यांच्यात अशीच लढत झाली. त्यात प्रितम मुंडे यांनी बजरंग सोनावणे यांचा सुमारे 80 हजार मतांनी पराभव केला आणि वंचितच्या उमेदवाराला तेथे पडलेली मते 93 हजार इतकी आहेत. वंचित आघाडीचे सांगलीत गोपिचंद पडाळकर यांनी तब्बल 3 लाख 234 मते घेऊन घेऊन विशाल पाटलांच्या विजयाचा मार्ग रोखून धरला. रावेर, चंद्रपुर, हिंगोली, लातुर, उस्मानाबाद, परभणी अशा मतदार संघांमध्येही वंचितच्या उमेदवारांना जवळपास लाखाची मते पडली आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here