सणासुदीची ग्राहक मागणीच ठरविणार बाजाराची दिशा

मागील आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कंझ्युमर कॉन्फिडन्स निर्देशांकानं गेल्या सहा वर्षांतील ८९.४ हा नीचांकी आकडा दर्शवल्यानं बाजार नकारात्मकरित्या बंद झाला. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REIT) आणि इन्फ्रास्ट्रक्चर इव्हेस्टमेंट ट्रस्ट यांच्यात परकीय गुंतवणूकदारांचा गुंतवणुकीचा वाढता कल, ज्याचा आवाका १० बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त असण्याची शक्यता गृहीत धरून व सरकारनं वाढवून दिलेला महागाईभत्ता ग्राहक मागणीवर सकारात्मक परिणाम करेल, या अपेक्षेनं मंगळवारच्या सुटीनंतर बाजारानं तेजी पकडली.

आठवड्याच्या अखेरीस इन्फोसिसच्या निकालांच्या अपेक्षेनं इन्फोसिसचा शेअर ४% वाढला तर टीसीएसच्या निकालानंतर ४ टक्क्यांच्या आसपास पडलेला त्याचा शेअर थोड्याफार नरमाईतच बंद झाला. आता, संपूर्ण महिन्याभरात जाहीर होणारे निकाल व सणासुदीच्या काळातील ग्राहकमागणी ह्याच गोष्टी खऱ्या अर्थानं बाजाराची दिशा ठरवतील. तांत्रिकदृष्ट्या, निफ्टी५०नं २३ सप्टेंबर रोजी नोंदवलेल्या ११६९४.८५ या उच्चांकानंतर निफ्टीनं प्रत्येक दिवशी उतरते उच्चांक बनवत एक उतरता कल साधलेला दिसतोय.

जोपर्यंत ही कलरेषा तोडून निफ्टी त्यावर अधिराज्य करत नाही तोपर्यंत बाजारात तूर्त तेजी येणं अवघड वाटतं. ही उतरती कलरेषा तूर्तास ११४०० च्या आसपास दिसत असून खालील बाजूस निफ्टीसाठी ११२०० ही लागलीच आधार पातळी म्हणून विचारात घेता येऊ शकते. मात्र ही पातळी तोडल्यास निफ्टी पुन्हा १११०० ते ११००० या पातळीपर्यंत घसरू शकते. अशा जर-तरच्या परिस्थितीतसुद्धा उत्तम निकाल देणाऱ्या कंपन्या ट्रेडर्सचं उखळ पांढरं करणार यात दुमत नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)