विकासकामाच्या निविदांचा धडाका

विधानसभेपूर्वी कामे मार्गी लावण्यासाठी धावपळ सुरू

चव्हाण रूग्णालयासाठी 69 लाखांचा खर्च

महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील विविध कामांसाठी 69 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. चव्हाण रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी कक्ष व इतर आवश्‍यक कामे करण्याचे नियोजन आहे. नवजात अर्भक विभाग, डॉक्‍टरांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण, रुग्णालयासाठी आवश्‍यकतेनुसार सीसीटीव्ही यंत्रणा, चाणक्‍य हॉलमधील ध्वनीक्षेपक यंत्रणेचे नूतनीकरण, चाणक्‍य हॉलच्या वरती दुसऱ्या मजल्याचे विस्तारीकरण, रूग्णालयातील आयसीयू 1 आणि 2 मधील वातानुकूलन यंत्रणेची वार्षिक देखभाल दुरूस्ती आदी कामांचा त्यामध्ये समावेश आहे.

पिंपरी – तीन महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. यामुळे दोन ते अडीच महिन्यांत आचारसंहिता लागू होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने सध्या विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध करण्याचा धडाका लावला आहे. सत्ताधारी देखील लवकरात-लवकर सर्व कामे मार्गी लावण्यासाठी धडपड करत असून यामुळे गेल्या आठवड्यात 507 विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या.

लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे विकासकामांच्या विविध निविदा प्रसिद्ध करण्यासाठी महापालिका प्रशासनाला विलंब झाला होता. 2019-20 हे नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर जवळपास तीन महिन्यांनी या निविदा प्रसिद्ध होत आहेत. निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर निविदा मंजुरी, प्रत्यक्ष कामाचे आदेश देणे आदी प्रक्रियांना विलंब लागू शकतो. येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्‍यता आहे. तत्पूर्वीच विकासकामे सुरू न झाल्यास आणखी रेंगाळू शकतात. त्यामुळे महापालिका प्रशासनाने निविदा प्रसिद्ध करण्याचा सध्या सपाटा लावला आहे.

महापालिका स्थापत्य विभागामार्फत गेल्या आठवड्यात 507 विकास कामांसाठी 157 कोटी 36 लाख रुपये रकमेच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. सर्व 8 क्षेत्रीय कार्यालयातंर्गत आणि स्थापत्य उद्यान विभागाशी संबंधित या निविदा आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण, पेविंहग ब्लॉक, पावसाळी गटारांची कामे, महापालिका दवाखाना व इतर इमारतींची दुरूस्ती, स्वच्छतागृह, स्मशानभूमी व दशक्रिया घाटाची स्थापत्यविषयक कामे आदींचा समावेश आहे. शहराच्या विविध भागांतील विकासकामांसह मोशी, चऱ्होली, दिघी, बोपखेल, डूडूळगाव, वडमुखवाडी आदी समाविष्ट गावांतील कामांचा देखील यामध्ये अंतर्भाव आहे. स्थापत्य विभागातर्फे 25 लाखाच्या आतील 365 कामांसाठी 63 कोटी 12 लाख रुपये रकमेच्या निविदा प्रसिद्ध झाल्या. तर, 25 लाखापुढील 94 कोटी 24 लाख रुपये रकमेच्या 142 कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या.

दरम्यान, महापालिका विद्युत विभागातर्फे मंगळवारी (दि. 2) 143 कामांसाठी एकूण 28 कोटी 38 लाख रुपये रकमेच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने पथदिवे, पथदिव्यांची दुरूस्ती, सर्व अग्निशमन केंद्रांमध्ये अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे, निळू फुले रंगमंदिर येथील विद्युतीकरणाची कामे, चिंचवड आणि रावेत उपविभागातंर्गत बीआरटीएस बसथांब्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे व इन्व्हर्टर, मुंबई-पुणे महामार्गावरील बीआरटीएस बस स्थानकात सीसीटीव्ही व इन्व्हर्टर बसविणे आदी प्रमुख कामांचा समावेश आहे.

“”महापालिका स्थापत्य विभागातर्फे गेल्या आठवड्यात 2019-20 या आर्थिक वर्षातील 507 विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या. पुढील महिनाभरात प्रत्यक्ष कामांना सुरूवात होऊ शकेल. त्याशिवाय, पुढील 15 दिवसांमध्ये आणखी विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.”

राजन पाटील, प्रभारी शहर अभियंता, महापालिका.

Leave A Reply

Your email address will not be published.