विधानसभा निवडणुकीत “वंचित’ सर्व जागा लढवणार

प्रकाश आंबेडकर; कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर जहरी टीका

कडेगाव – वंचित आघाडीकडून कॉंग्रेसला विधानसभेसाठी 144 जागांची ऑफर देण्यात आली होती. मात्र त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. आता तर कॉंग्रेसबरोबर आम्ही बातचीतच बंद केली आहे. आमचे 288 उमेदवार निवडणूक लढवणार असून यामध्ये एमआयएमही आमच्या बरोबरच असणार असल्याचे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केले. दरम्यान कॉंग्रेस व राष्ट्रवादी वरही त्यांनी जहरी टीका केली.

येथील विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सचिन माळी, चंद्रकांत खांबे, भरत लोकरे, संभाजी मोहिते, बाळकृष्ण देसाई, संजय करपे यांसह वंचितचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, सर्वात जुना पक्ष असलेल्या कॉंग्रेसला सध्या पॅरालिसिस झाला आहे. ते चालू-बोलू शकत नाहीत. तसेच राष्ट्रवादी देखील मृत्यू अवस्थेत पडली आहे. या पक्षांच्या नेत्यांसमोर भाजपने दोनच पर्याय ठेवले आहेत.

सत्ता चालू द्या, अथवा तिहार जेलचे दरवाजे उघडे आहेत. मी असे काहीच केलं नाही, त्यामुळे माझ्यामागे हे सरकार ससेमिरा लावू शकत नाही, आणि म्हणूनच मी या सरकारला आडवे घेऊ शकतो. जे-जे आपल्यासोबत येणार नाहीत किंवा सरकार विरोधात बोलतील त्यांच्यामागे भाजप सरकारने चौकशी लावली आहे. केंद्रात बहुमतात भाजप सरकार असल्याने सर्व तपास यंत्रणेमार्फत विरोधकांवर चौकशीची टांगती तलवार आहे. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील नेते पक्षांतर करत आहेत. या नेत्यांना समाजाच्या स्वातंत्र्यापेक्षा व्यक्तीस्वातंत्र्य टिकवायचे आहे.

पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, सातारा- सांगलीमध्ये महापूर आला त्यावेळेस सारखीच उदासीनता आत्ता गडचिरोली, भंडारा व गोंदिया येथे आलेल्या महापुरासंदर्भात सरकारची आहे.तिकडे लक्ष न देता सरकार येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दौरे करत सुटले आहे. पक्ष फोडाफोडी करणे सुरु आहे. देशात लोकशाही राहिलीतर परिस्थिती नियंत्रणात राहील. आमच्या विरोधात आवाज उठवला तर त्यांच्याविरोधात कारवाई करू, अशी सध्या भाजपची वाटचाल सुरू आहे. ही एकप्रकारे हुकूमशाहीची सुरुवात आहे. काहीही करून येणाऱ्या निवडणुकीत भाजपची सत्ता आली नाही पाहिजे.

लक्ष्मण माने व माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील वंचित आघाडीमधून बाहेर का पडले? याबाबत विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले, हे दोन्ही नेते वंचित आघाडीला सोडून गेल्याचे दुःख आहे. माने शिवसेनेत जाण्याचे बोलत असतील तर हे दुर्दैव आहे. कोळसे पाटील हे जनता दलाचे नेते आहेत, आमचे नाहीत. एमआयएम वंचित आघाडीतून बाहेर पडलेली नाही. ओबीसी यांच्यासोबत चर्चा सुरू आहे तेच निर्णय घेतील. जागा वाटपाबाबत आंबेडकर म्हणाले, आमच्या सोबत असणारे पक्ष व संघटना यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. आपापल्या पद्धतीने त्यांनी जागा मागितल्या आहेत. उमेदवारी देताना यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.