सुनीता शिंदे
कराड – विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाबरोबर मनोरंजन व्हावे, या उद्देशाने प्रतिवर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यात शालेय सहलींचे आयोजन केले जाते. गतवर्षी शासनाने घातलेल्या जाचक अटींमुळे शाळांनी शैक्षणिक सहली रद्द केल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक नाराज झाले होते.
यंदा काही जाचक अटींना बगल देत शाळांनी डिसेंबर महिन्यात शैक्षणिक सहलींचे आयोजन केल्याचे समजते. शासन नियम मोडणाऱ्या या शाळांवर कोण अंकुश ठेवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शालेय उपक्रमांतर्गत प्रतिवर्षी शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. यापूर्वी एक दिवसासह दोन ते पाच दिवसांच्या मुक्कामी सहलींचे नियोजन केले जात होते. शाळांमध्ये सहलींच्या नियोजनासाठी शिक्षकांची लगबग सुरू असायची.
सहलींच्या माध्यमातून पैसे उकळण्याचे प्रकारही काही शिक्षण संस्थांमध्ये होत होते. वरिष्ठांना सहलीचे शुल्क दाखवायचे एक आणि पालकांकडून उकळायचे वेगळे, असे प्रकार शाळांमधून घडत होते. अनेक शाळा लांब पल्ल्याच्या सहलींचे नियोजन करायच्या. सहलीच्या मार्गांवरील रस्ते कसे आहेत, तेथे भोजन-निवासाची सोय कशी आहे, याची माहिती न घेताच नियोजन केल्याने अनेक शाळांच्या सहलींचे बेत फसत होते.
सहलींमध्ये अपघात होऊन विद्यार्थी व शिक्षकांचे बळी जाण्याच्या तुरळक घटनाही घडत होत्या. या प्रकारांना आळा घालण्यासाठी गतवर्षी राज्य शासनाने शैक्षणिक सहलींवर निर्बंध आणले होते. शाळांनी 300 किलोमीटर अंतराच्या व एक दिवसाच्याच सहलींचे नियोजन करावे, अशी अट घालण्यात आल्याने गतवर्षी कराड तालुक्यातील एकाही शैक्षणिक संस्थेने सहलीचे नियोजन केले नव्हते.
मात्र, यंदा नियमांना बगल देत डिसेंबर महिन्यात सहलींचे नियोजन केले आहे. एक दिवस मुक्कामाची सहल न्यावी, असा नियम असतानाही दोन-तीन दिवसांच्या मुक्कामी सहलींचे नियोजन केल्याचे समजते. यंदा अतिवृष्टीमुळे राज्यात सर्वत्र रस्त्यांची अवस्था बिकट आहे. त्याकडे शिक्षण संस्थांनी दुर्लक्ष केले असून सहलींसाठी कोणाची परवानगी घेतली? गटशिक्षणाधिकाऱ्यांना माहिती दिली का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
सहलींच्या आयोजनाचे नियम
सहलींबाबत शासनाचे नियम, मुख्याध्यापकाचे पत्र, शाळा समितीचा ठराव, गटशिक्षणाधिकाऱ्याचे पत्र, एसटी आगारप्रमुखाचे पत्र, केंद्रप्रमुखाचे पत्र, शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचे पत्र, पालकांचे व विद्यार्थ्याचे संमतीपत्र, सहलीतील सहभागी विद्यार्थ्यांची व शिक्षकांची यादी, सहलीची नियमावली, नियोजन, ठिकाणे व नकाशा, खर्चाचे अंदाजपत्रक, प्रथमोपचारपेटी सोबत असल्याचे पत्र, विद्यार्थ्यांकडील साहित्याची यादी, शिक्षणाधिकाऱ्याचे मान्यतापत्र, सहल राज्याबाहेर जात नसल्याचे मुख्याध्यापकाचे हमीपत्र, विद्यार्थी विमा, रक्तगटांची माहिती, खासगी वाहने आरक्षित केले नसल्याची हमी, असे शासनाचे नियम आहेत.