दांडीबहाद्दरांना अभय देणे विभागप्रमुखांना पडणार महागात

पिंपरी  – महापालिका आस्थापनेवर कार्यरत असलेले कर्मचारी विनापरवाना गैरहजर राहत असल्याने कामांचा खोळंबा होतो. मात्र, अशा गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे टाळणाऱ्या विभागप्रमुखांवरच आता कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी तसा इशारा दिला आहे. त्यामुळे सर्वच विभागप्रमुखांचे धाबे दणाणले आहेत.

महापालिकेत विविध पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे विनापरवाना गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा थेट परिणाम महापालिका कामकाजावर होत आहे. काही कर्मचारी विनापरवाना अगदी महिनाभरापासून ते वर्ष-वर्षभर कामावर हजर होत नसल्याच्या अनेक बाबी समोर आल्या आहेत. महापालिका आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असताना, विनापरवाना गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामकाज करण्यात अनेक अडचणी येत आहेत.

या सर्व बाबींचा प्रशासनाकडून आढावा घेण्यात आला. गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर विभागप्रमुखांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्‍त हर्डीकर यांनी स्वत: लक्ष घातले आहे. त्याकरिता विनापरवाना एक महिना गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून, कारवाई करण्याच्या सूचना आयुक्‍तांनी दिल्या आहेत. याशिवाय वर्षभरापेक्षा अधिक काळ विनापरवाना गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून, त्यांचा खुलासा मागवून खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्‍तांनी दिले आहेत.

दरम्यान, प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्‍त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मंगेश चितळे यांनी पथकातील कर्मचाऱ्यांसोबत अचानक तपासणी करुन, विनाकारण कॅन्टीनमध्ये बसणाऱ्या, कामाचे ठिकाण सोडून अन्यत्र फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला होता. त्यावेळी पाहणीत आढळलेल्या कर्मचाऱ्यांच्या विभागाची नोंद घेत, संबंधित विभागप्रमुखांकडे या कर्मचाऱ्यांची यादी सोपवत, त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी सोपविली होती. मात्र, या कमरचाऱ्यांवर विभागप्रमुखांनी कोणत्या प्रकारची कारवाई केली, याची माहिती खुद्द प्रशासन विभागाकडेच उपलब्ध नाही. त्यामुळे विभागप्रमुख कर्मचाऱ्यांना पाठिशी घालत असल्याचे स्पष्ट झाले. आयुक्‍तांनी परिपत्रक काढल्याने महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.