दैनिक “प्रभात’च्या वृत्तानंतर करण्यात आली कार्यवाही
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भांडार विभागाने कायद्याची मोडतोड करत ठेकेदारांना पोसण्यासाठी दिलेल्या त्या दोन्ही निविदांना भांडार विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे यांनी आज (शुक्रवारी) स्थगिती दिली. या दोन्ही कामांसाठी तब्बल दोन कोटींहून अधिक रक्कमेची उधळपट्टी करण्यात येणार होती. पुढील आदेश येईपर्यंत ही स्थगित राहणार आहे.
भांडार विभागामार्फत उद्यान विभागासाठी पुनर्प्रत्ययी आदेशाचा गैरवापर करीत ट्री गार्ड खरेदीसाठी स्थायीची मंजूरी घेण्यात आली होती. हे काम रेखा इंजिनिअरिंग या ठेकेदाराला देण्यात आले होते. सप्टेंबर 2019 मध्ये याच ठेकेदाराने महापालिकेला 35 लाख रुपयांचे ट्री गार्ड पुरविले होते. या कामाचा दाखला देत पुनर्प्रत्ययी आदेशाचा आधार घेत पुन्हा 1481 ट्री गार्ड खरेदीच्या कामाला स्थायीच्या शेवटच्या सभेत घाई-घाईत मंजुरी घेण्यात आली होती.
विशेष बाब म्हणजे 1 हजार 500 ट्री गार्डची मागणी असताना त्यामध्येही मोडतोड करण्यात आली होती. तर उद्यान विभागासाठीच तब्बल 12 हजार 979 रुपये प्रति बेंच या प्रमाणे 1 कोटी 94 लाखांचे दीड हजार बेंच खरेदी करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. त्यासही स्थायीच्या शेवटच्या सभेत मान्यता घेण्यात आली होती. 4 हजारांना मिळणारा बेंच तब्बल 12 हजार 979 रुपयांना खरेदी केला जाणार होता.
या संपूर्ण गैर प्रकाराबाबत दैनिक प्रभातने शुक्रवारी (दि. 6) कायद्यातील तरतुदी व तांत्रिक बाबींसह वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची भांडार विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे यांनी गंभीर दखल घेत दोन्ही कामांना स्थगिती दिली आहे. पुढील आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत हे आदेश कायम राहतील, अशी माहिती सहायक भांडारपाल मुबारक पानसरे यांनी “प्रभात’शी बोलताना दिली.