अकोले विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे ठेवण्याची ठाकरेंकडे मागणी

प्रा. डी. के. वैद्य

आमदार दराडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली मातोश्रीवर भेट

अकोले  – अकोले विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे ठेवावा, असा आग्रह शिर्डी लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख आ. नरेंद्र दराडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यावर केवळ पदाधिकारी बदलासाठीची ही खेळी होती. ठाकरे यांनी या शिष्टमंडळाला सबुरीचा सल्ला दिल्याची माहिती दुसऱ्या गटाकडून देण्यात आली. यामुळे मागील महिन्यात आ. दराडे यांनी अकोले तालुक्‍यातील दोन गटांत मनोमीलन घडवून आणण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आ. दराडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या शिष्टमंडळात संपर्क प्रमुख आ. नरेंद्र दराडे यांच्या सोबत माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे, कैलासराव शेळके, अगस्ती सहकारी साखर कारखाना संचालक महेश नवले, सुरेश भिसे, बाळासाहेब कुमकर, शिवाजी शेटे, नंदकुमार वाकचौरे, बाळासाहेब मालुंजकर, अतुल लोहटे, मिलिंद नाईकवाडी, भरत मेंगाळ आदी शिवसैनिकांचा समावेश होता.
अकोले विधानसभा मतदार संघ गेले 35 वर्षे शिवसेना पक्षाकडेच आहे व येणारी विधानसभा शिवसेना व भाजप युती लढवणार आहे. मात्र भाजप अकोले विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या चर्चा झडत आहे व तशा बातम्या येत आहेत.

तेंव्हा अकोले विधानसभा शिवसेनेकडेच ठेवावा, असा या शिष्टमंडळाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे आग्रह धरला. जरी मतदारसंघ शिवसेनेकडे ठेवण्याची मागणी असली, तरी हे शिष्टमंडळ विद्यमान पदाधिकारी बदलण्यासाठी गेले होते, अशी दबक्‍या आवाजात चर्चा सुरू आहे. या शिष्टमंडळाने उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे व मच्छिंद्र धुमाळ व अन्य पदाधिकाऱ्यांबाबत तक्रार करुन पक्षाला निवडणुकीत यश मिळवायचे असेल, तर पदाधिकारी खांदे पालटाचा आग्रह धरला, असे कार्यकर्त्यांकडून सांगितले गेले. शिष्टमंडळ हे खरोखर अकोले विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे राहावा, यासाठी गेले होते, तर दुसऱ्या गटाला आ. दराडे यांनी का सोबत घेतले नाही? असा सवाल अकोले तालुका शिवसेना प्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी केला.

याबाबत उद्धव ठाकरे यांनी आलेल्या शिष्टमंडळाला सबुरीचा सल्ला दिला. आणि योग्य वेळेस योग्य ती कारवाई केली जाईल. सध्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यामुळे याबाबत नंतर निर्णय घेण्याबाबत स्पष्ट अशी ग्वाही दिली नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत दुहीची बिजे पक्षात कायम असून, या दोन्ही गटांच्या शह काटशह भूमिकेमुळे पक्षाची ही जागा भाजपकडे जाणार काय? असा सवाल सामान्य शिवसैनिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.