पिंपरी – मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातील उपवासात खजूराचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. रमजान महिन्यातील उपवासात खजूराला अनन्यसाधारण महत्व असते. यामुळे, पिंपरी मार्केटमध्ये खजुराची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून सध्या बाजारात 40 रुपये प्रतिकिलो ते 1200 प्रतिकिलो खजूराचे भाव आहेत.
रमजान महिन्यात खजूराची विक्री मोठ्या प्रमाणात होते. यामुळे, शहरातील बाजारपेठा व दुकानांमध्ये विविध प्रकारातील खजूर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये, लाल खजूर साधारण 40 रुपये ते 400 रुपये किलो, काळा खजूर 150 ते 1200 रुपये प्रति किलो आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खजूराचे भाव स्थिर आहेत. मुस्लिम समाजात अजवा जातीच्या खजुराला अधिक मागणी आहे. अजवा, वुमेन व मगजोल या जातीचे खजूर चवीलाही चांगले व आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असल्याने या खजुराला मागणी असल्याचे बाजारात फेरफटका मारला असता दिसून आले.
खजूराच्या 40 हून अधिक जाती यामध्ये अजवा, वुमेन, किमया, सुलतान, सुकरी, मगजोल, फर्द, रुक्सान, बुरारी यासह विविध जातींचा समावेश आहे. सुकरी, अजवा, मगजोल यांचे दर जास्त असून सुमारे 1200 रुपये प्रतिकिलो आहेत. तसेच, भारतात इराण, इराक, सौदी, ओमान या देशातून भारतात खजुराची आयात केली जात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.