नगर – सध्या थंडीचे दिवस असल्याने अंड्याला ग्राहकांकडून – व्यायाम प्रेमीकडून मोठी मागणी आहे. अंडी बाजारात मोठ्या प्रमाणात अंडी विक्री होत असून सध्या शहरात अंड्याची किरकोळ विक्री सहा रुपयांनी केली जाते. अंड्याचे मागणी वाढली, मात्र भावात फारसी वाढ झाली नसल्यामुळे पोल्ट्रीधारकांचा ना नफा-ना तोटा असा व्यवसाय सुरू आहे.
गेल्या काही दिवसात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. वाढत्या थंडीत आरोग्यासाठी पोषक समजण्यात येणाऱ्या अंड्याच्या मागणीत ग्राहकांकडून लक्षणीय वाढ झाली. मात्र एरवी या अंड्यांना ग्राहकांकडून विशेष मागणी राहात नाही. मात्र थंडीचा जोर वाढतच अंड्याच्या मागणीत आणि दरांमध्ये वाढ झालेली दिसून येते. या थंडीच्या दिवसात नागरिकांकडून अंड्याला विशेष पसंती दिली जाते. यासोबत गेल्या काही दिवसात भाजीपाल्यांचे दर वाढल्याने अंड्याला पसंती दिली जात असून अंड्यांच्या मागणीचा जोर वाढलेला आहे.
शहरात इतर ऋतूत अंड्यांची विशेष मागणी होतांना दिसत नाही. मात्र थंडीचा जोर वाढल्याने या मागणीत चांगलीच वाढ झाल्याने अंडी विक्रेत्यांकडून इतर राज्यातून देखील अंड्यांची आवक केली जात आहे. तर संसाराला आर्थिक हातभार लागण्यासाठी सर्वसामान्यांनी देशी कोंबड्या पालन सुरू केले आहे. या देशी अंड्यांना विशेष मागणी आहे. प्रतिअंडे पाच रुपये असलेला देशी अंड्याचा दर आता दहा रुपये झाला आहे.
अंड्यांचे दर
सध्या थंडीचा जोर वाढल्याने अंड्यांची मागणी वाढलेली आहे. किरकोळ बाजारात सहा रुपये दराने अंड्यांची विक्री होत आहे. थंडीचा जोर वाढल्यास भाववाढ होईल असे अंडी विक्री व्यवसायिकांनी सांगितले. ठोकमध्ये गावरान अंडे 110 रुपये डझन, बॉयलर अंडे 63 रुपये डझन मिळत आहे. गावरान अंड्याचा ट्रे 275 रुपयांना मिळत असून बॉयलर अंड्याचा ट्रे 155 रुपये असे अंड्याचे दर आहेत.
इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यात अंड्यांची मागणी वाढलेली असते. मात्र भाववाढ झालेली दिसत नाही. थंडीत वाढ झाली तर विक्रीत वाढ होऊ शकते आणि पर्यायाने भाव वाढीत वाढ होईल. बऱ्याचदा नेकच्या चुकीच्या धोरणामुळे पोल्ट्री व्यावसायिक संकटात सापडतात. नेक दर वाढविताना एक किंवा दोन रुपयांनी वाढविते. तोच दर कमी करताना मात्र अल्प पैशांनी कमी केला जातो. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. दर कायम असावेत, तरच चांगला व्यवसाय करता येऊ शकतो.
पुनीत सिंग, अंडे विक्रेते, भुतानी एग्ज अँड चिकन