नवी दिल्ली : केंद्र सरकारने दिल्लीला केला जाणारा ऑक्सिजनचा साठा काही प्रमाणात वाढवला असून त्याचे उत्तम नियोजन करून ऑक्सिजनचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दिल्लीला आतापर्यंत 378 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा होत असे तो आता 480 मेट्रिक टन इतका करण्यात आला आहे.
दिल्ली आपत्कालीन प्राधिकरणाने या कामी तीन आयएएस अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून हे अधिकारी शहरातील प्रत्येक हॉस्पिटलला पुरेशा व सुरळीत प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होईल, याची काळजी घेणार आहेत. ज्या रुग्णालयांतील ऑक्सिजन साठा संपत आला असेल अशाच रुग्णालयांना तातडीची बाब म्हणून या बफर स्टॉकमधून ऑक्सिजन पुरवला जाणार आहे.
प्रत्येक रुग्णालयानेही ऑक्सिजन पुरवठ्याविषयी एक नोडल अधिकारी नियुक्त केला पाहिजे, तो अधिकारी केवळ ऑक्सिजन पुरवठा याच विषयावर काम करेल अशी सूचनाही दिल्ली सरकारने त्यांना केली आहे. प्रत्येक रुग्णालयांनी उपलब्ध ऑक्सिजनच्या वापराचे ऑडिट करणेही गरजेचे आहे. काही ठिकाणी जास्तीचा ऑक्सिजन वापरला गेला असेल तर तो का वापरला गेला याचेही त्यांनी संयुक्तिक कारण दिले पाहिजे, अशा सूचनाही रुग्णालयांना करण्यात आल्या आहेत. ऑक्सिजनच्या उपलब्धतेचे रेकॉर्ड ठेवून ते रोजच्या रोज राज्य सरकारच्या प्राधिकरणाकडे पाठवण्याची सूचनाही त्यांना करण्यात आली आहे.