नवीन बिलिंग यंत्रणा लवकरच कार्यान्वित होण्याची अपेक्षा
दक्षिण मुख्यालय रक्षा लेखा विभागाचा 68 वा स्थापना दिवस
पुणे – संरक्षण दलाच्या खरेदी व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच हे काम जलदगतीने व्हावे, यासाठी लष्कराच्या आर्थिक व्यवहारांची देखरेख करणाऱ्या “रक्षा लेखा’ विभागातर्फे लवकरच अत्याधुनिक बिलिंग यंत्रणा कार्यरत केल जाणार आहे. त्यासाठी संस्थेतर्फे अत्याधुनिक तंत्रज्ञानासंदर्भात माहिती घेण्याचे काम सुरू आहे. लवकरच ही यंत्रणा प्रत्यक्षात आणून सैन्यदल आणि दक्षिण मुख्यालयाच्या विविध खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये सुसूत्रता आणि गतिमानता आणली जाईल, अशी अपेक्षा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
दक्षिण मुख्यालयाच्या रक्षा लेखा विभागाचा 68 वा स्थापना दिवस मंगळवारी पार पडला. याप्रसंगी 100 वर्षांपूर्वीच्या ब्रिटिशकालीन भोजन परंपरेची पुनरावृत्ती आणि विविध उपक्रममांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे प्रमुख मयंक शर्मा यांनी या “ऑटोमेटेड बिल प्रोसेसिंग सिस्टम’बाबत माहिती दिली.
शर्मा म्हणाले, “नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत, कामामध्ये गतीमानता आणण्यासाठी रक्षा लेखा विभागाकडून नेहमीच प्रयत्न केले जातात. त्याचअनुषंगाने “बिलिंग’ यंत्रणेतही नवीन तंत्रज्ञान समाविष्ट करून, कामाची गती वाढविण्याबाबत सात्यत्याने मागणी होत होती. याची दखल घेत विभागाने आता पूर्णपणे स्वयंचलित “बिल’प्रक्रिया यंत्रणा सामाविष्ट करण्याबाबत प्रयत्न सुरू केले असून, लवकरच ही यंत्रणा कार्यरत होईल. या यंत्रणेच्या समावेशामुळे विभागाचे काम जलद होऊन मुख्यालयाच्या खरेदीसंदर्भातील प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत मिळेल.
दक्षिण मुख्यालयाच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी असणाऱ्या रक्षा लेखा विभागातर्फे महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम राजस्थान या राज्यांमध्ये काम पाहिले जाते. सुमारे तीन लाख लष्करी अधिकारी-जवान यांच्या वेतनासंदर्भातील कामे या विभागाकडून केली जातात. याप्रसंगी विविध सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.