दिल्लीतील कॉंग्रेसचा पराभव म्हणजे कोरोनाची आपत्ती

जयराम रमेश यांची स्वतःच्याच पक्षाच्या फेररचनेची सूचना

कोची : दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाचा झालेला दारुण पराभव म्हणजे करोना विषाणूच्या प्रादुर्भावासारखी भीषण आपत्ती असल्याचे मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी व्यक्‍त केले आहे. कॉंग्रेस पक्षाने मूळापासून फेररचना करण्याची आवश्‍यकता आहे. अन्यथा कॉंग्रेस पक्षाचे अस्तित्व अप्रस्तुत बनून जाईल, असा इशाराही रमेश यांनी दिला आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या रमेश यांनी आतापर्यंत आपली मते स्पष्टपणे आणि परखडपणे मांडली आहेत. त्यामुळेच त्यांच्या या विधानाला विशेष महत्व आहे. एम विरप्पा मोईली यांच्या सारख्या नेत्यानेही पक्षामध्ये नवचैतन्य आणण्यासाठी “सर्जिकल स्ट्राईक’ची आवश्‍यकता असल्याचे म्हटले आहे. त्यातच रमेश यांनीही थेट टिप्पणी केली आहे.

“जर कॉंग्रेस पक्ष शिल्लक रहावा, असे वाटत असेल तर कॉंग़्रेसच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे. आपला अहंकार गेलाच पाहिजे. गेल्या 6 वर्षांपासून सत्तेबाहेर असूनही आपल्यातील काही जण अजूनही मंत्री असल्याप्रमाणेच वागत आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य आणि स्वायत्तता दिली गेली पाहिजे. आपल्या नेतृत्वातील सार आणि वैशिष्ट्य हे बदलले गेले पाहिजे. ‘ असे रमेश यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

केरळ सरकारने आयोजित केलेल्या क्रिथी आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यामध्ये ते बोलत होते. भाजपने “सीएए’विरोधी आंदोलनाचा वापर मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी केला, असा आरोपही रमेश यांनी केला. या शर्यतीमध्ये भाजप जरी विजयी झाली नसली, तरी कॉंग्रेसचाही मोठा पराभव झालेला आहे. हा पराभव करोना विषाणूच्या आपत्तीसारखाच आहे. दिल्लीच्या निकालाने गृहमंत्री अमित शहा यांच्या राजकीय शैलीचा पराभव केला आहे, असेही रमेश म्हणाले.

कॉंग्रेसला बिहार आणि उत्तर प्रदेशात अस्तित्व नाही. मात्र राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये कॉंग्रेस समर्थ झाली आहे. तसेच हरियाणातही कॉंग्रेसने पुन्हा बळ मिळवले असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.