बांगलादेश आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक घट्ट होणे ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. बांगलादेशने पाकिस्तानसाठी निर्बंध शिथिल केल्याने अवैध शस्त्रे आणि अंमलीपदार्थांच्या हालचाली वाढू शकतात.
बांगलादेश सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या आमसभा अधिवेशनावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांची भेट घेतली होती. हे पाऊल पाकिस्तान-बांगलादेशच्या संबंधात ऐतिहासिक बदल दर्शविते. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली दोन देशांमधील संबंध आणखी घट्ट होण्याचे हे संकेत. मात्र या दोन देशांतील वाढत्या संबंधांचा विशेषतः भारताच्या सुरक्षेवर परिणाम होणार आहे.
कराचीहून पाकिस्तानी माल घेऊन आलेले एक चिनी जहाज 13 नोव्हेंबरला बांगलादेशातील चितगांव बंदरात आले. 1971 बांगलादेश मुक्ती युद्धोत्तर प्रथमच एखादे पाकिस्तानी जहाज बांगलादेशच्या बंदरात पोहोचले. दोन्ही देशांदरम्यान मर्यादित व्यापारी आणि राजनैतिक संबंध आहेत. दोन देशांदरम्यान 2023 मध्ये 800 कोटी डॉलर इतक्या व्यापाराची नोंद आहे. प्रस्तुत जहाजातून बांगलादेशातील कापड उद्योगासाठी लागणारी कच्ची सामग्री आणि काही खाद्यापदार्थ होते. हे व्यापारी जहाज कराचीतून माल घेऊन बांगलादेशला आले. पण बंदरामध्ये या जहाजातील सामानाचे फिजिकल इन्स्पेक्शन करण्यात आले नाही. त्यामुळे चिनी जहाजातून पाकिस्तान माल बांगलादेशात पोहोचला. बांगलादेशातील सरकारने अशा प्रकारे सवलत देऊन पाकिस्तानी माल आणि भविष्यातील व्यापारासाठी, एक वाट खुली करून दिली आहे.
अद्यापही पाकिस्तान-बांगलादेश व्यापारी करारही झालेला नाही. पण बांगलादेशात सध्या भारतविरोधी जनमत तीव्र असताना पाकिस्तानने बांगलादेशाशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यास बांगलादेशकडून प्रतिसादही आला, हे विशेष. जहाजाने पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीमधून माल आणला, ज्यात बांगलादेशच्या प्रमुख वस्त्र उद्योगासाठी कच्चा माल आणि मूलभूत खाद्यपदार्थांचा समावेश आहे. सर्वात मोठी शिपमेंट सोडियम कार्बोनेट (सोडा अॅश) होती, ज्याचा वापर कापड उद्योगात केला जातो. पाकिस्तानचे उच्चायुक्त म्हणाले की, हा उपक्रम सध्याच्या व्यापाराला गती देईल आणि छोट्या व्यापार्यांपासून मोठ्या निर्यातदारांपर्यंत दोन्ही बाजूंच्या व्यवसायांसाठी नवीन संधींना चालना देईल. बांगलादेशमधील मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने पाकिस्तानी वस्तूंवरील आयात निर्बंध शिथिल केल्यानंतर, ही थेट शिपमेंट झाली आहे. याआधी अशा मालाचे आगमन झाल्यावर अनिवार्य तपासणी करणे आवश्यक होते. मात्र ते आता करण्यात आले नाही.
पाक-बांगलादेश संबंध दृढ होणार
1971 मध्ये स्वातंत्र्ययुद्धानंतर दोन्ही देश विभाजित झाले. या स्वातंत्र्ययुद्धात लाखो लोक मारले गेले होते. आजवर बांगलादेशच्या नागरिकांच्या मनात या स्मृती खोलवर रुजल्या आहेत. शेख हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेशने पाकिस्तानला वेठीस धरले होते. पाकिस्तानचे संस्थापक मुहम्मद अली जिना यांची 76वी पुण्यतिथी ढाका येथील नॅशनल प्रेस क्लबमध्ये उर्दू शायरीने साजरी करण्यात आली. कार्यक्रमातील सहभागींनी जिना यांची प्रशंसा केली आणि म्हटले की, जिना हे आपल्या राष्ट्राचे पिता आहेत आणि पाकिस्तानशिवाय आज बांगलादेश अस्तित्वात नसता.
हसीना यांच्या हकालपट्टीनंतर पाकिस्तानशी व्हिसा प्रक्रिया सुलभ झाली आहे. सप्टेंबरमध्ये पाकिस्तानने जाहीर केले की, बांगलादेशी व्हिसा शुल्काशिवाय देशात प्रवास करू शकतात. बांगलादेशने पाकिस्तानला नव्याने तोफखाना, दारूगोळा पुरवण्याचे आवाहन केले आहे. या ऑर्डरमध्ये 40 हजार दारूगोळा, 40 टन आरडीएक्स स्फोटकचा समावेश आहे. ही ऑर्डर नेहमीपेक्षा खूप जास्त आहे. 2023 मध्ये पूर्वीची ऑर्डर 12 हजार दारूगोळ्यांसाठी होती.
ढाका युनिव्हर्सिटीतील आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्राध्यापक डॉ. शाहिदझ्झमन यांचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात त्यांनी भारताविरुद्ध संरक्षण म्हणून पाकिस्तानशी अणुकरार करण्याविषयी आपले मत मांडले होते.
भारतावर परिणाम
2004 मध्ये भारतातील दहशतवादी संघटना युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असोमसाठी शस्त्रास्त्रांची खेप बांगलादेशच्या चितगाव येथे रोखण्यात आली. ही शिपमेंट पाकिस्तानने प्रायोजित केल्याचा आरोप भारताने केला होता. भारत-बांगलादेश व्यापार काही अब्ज डॉलरचा आहे आणि त्याच्याशी बरोबरी करण्याची पाकिस्तानची क्षमता नाही. पण पाकिस्तानचा माल कोणत्याही परीक्षणाविना बांगलादेशात दाखल होणे हे भारतासाठी धोक्याचे ठरू शकते.
भारताविरुद्ध घातपाती सामग्री ठिकठिकाणी पाठवण्याचे काम पाकिस्तानने केले आहे. बांगलादेशातील भारतविरोधी जनमताचा फायदा उठवून तेथील काही माथेफिरूंपर्यंत अशी सामग्री पोहोचवणे अवघड नाही, ज्यामुळे ईशान्य भारतात शस्त्रे, दारूगोळा, अफू, गांजा, चरस पाठवता येईल. पूर्व आणि ईशान्येकडील पाच राज्ये बांगलादेश सीमेला लागून आहेत आणि त्यात पश्चिम बंगाल आणि आसामसारख्या संवेदनशील राज्यांचा समावेश होतो. या सीमांतून लाखो बांगलादेशी भारतात घुसले आहेत. तपासणी फार चिकित्सक पद्धतीने होत नाही. पण आता दक्षता वाढवावी लागेल.