आ. अजित पवार, पालकमंत्री विजय शिवतारे यांची प्रमुख उपस्थिती
वाई – नगर परिषदेच्या हद्दीतील सोनगिरवाडी येथे विकसित करण्यात आलेल्या वैकुंठ स्मशानभूमीचे लोकार्पण गुरुवारी, दि. 25 महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा डॉ.प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत व मुख्याधिकारी विद्याताई पोळ यांनी पत्रकाद्वारे दिली.
नगरपालिकेच्यावतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत 65 लाख रुपये खर्च करून कृष्णा नदीवर सोनगिरवाडी येथील स्मशानभूमी विकसित करण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्यात आली. त्यानंतर स्मशानभूमी विकसित करणे, या कामात विसावा शेड, अग्निकुंड, घाटाचे बांधकाम, संरक्षक भिंत आणि अन्य आवश्यक सुविधा यांसाठी 1 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
वाई शहराच्या उजव्या तीरावरील सोनगिरवाडी आणि यशवंतनगर या भागांतील नागरिक याठिकाणी अंतिम संस्कार करतात. त्यामुळे शहराच्या गरजेनुरूप व दर्जेदार पद्धतीने परिसर विकास करण्यात आला आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष व स्थानिक नगरसेवक अनिल सावंत यांनी दिली. सायंकाळी 4.30 वाजता होणाऱ्या लोकार्पण कार्यक्रमास व त्यानंतर सोनगिरवाडी येथील ज्योतिबा यात्रा मैदान येथे होणाऱ्या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्षा डॉ.सौ. शिंदे,उपनगराध्यक्ष सावंत यांनी केले आहे.