मुंबई –औद्योगिक उत्पादनाची नकारात्मक आकडेवारी जाहीर झाली आहे. त्याचा शेअरबाजार निर्देशांकांवर परिणाम झाला. बुधवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 37 अंकांनी म्हणजे 1.10 टक्क्यांनी कमी होऊन 38,369 अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक 14 अंकांनी कमी होऊन 11,308 अंकांवर बंद झाला. जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश येऊनही भारतीय शेअरबाजारात नफा काढून घेण्याचे प्रमाण वाढल्यामुळे निर्देशांक कमी झाले, असे रेलिगेअर ब्रोकिंग कंपनीचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले.
ते म्हणाले की, विकसित देशातील औद्योगिक उत्पादन कमी होऊन बेरोजगारी वाढत आहे. त्याचबरोबर अमेरिका- चीन तणाव वाढत असल्यामुळे गुंतवणूकदार आता सावध राहून व्यवहार करतील. बुधवारी वाहन, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअर वधारले. तर आरोग्य ग्राहक वस्तू, धातू, दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर विकून गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला. मुंबई शेअर बाजाराचा मिडकॅप आणि स्मॉलकॅप 0.29 टक्क्यांपर्यंत घसरले. भारतीय शेअरबाजाराचे निर्देशांक इतर देशांच्या तुलनेत जास्त आहेत.