आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर

नवी दिल्ली – भारतातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने लांबणीवर टाकला आहे. देशातून 15 डिसेंबर पासून ही विमान सेवा सुरू होणार होती. पण आता जगभर पुन्हा कोविडच्या नवीन विषाणुचा संसर्ग सुरू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ही विमान सेवा कधी सुरू होणार याचा निर्णय नंतर जाहीर केला जाईल अशी माहिती विमान वाहतूक महासंचालनालय कार्यालयाने दिली आहे.

देशातील व अन्य जगातील कोविड स्थिती सुधारल्यानंतर गेल्याच महिन्यात केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घोषित केला होता. देशातून जगाच्या अन्य भागातील विमान सेवा मार्च 2020 पासून बंद आहे.

सध्या विदेशातून भारतात येणाऱ्या विमानांच्या तसेच प्रवाशांच्या बाबतीत अनेक नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संपुर्ण युरोपातून तसेच दक्षिण अफ्रिका व अन्य अफ्रिकन देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना सक्तीच्या कोविड चाचण्यांबरोबरच त्यांना संस्थात्मक विलगीकरणही सक्तीचे करण्यात आले आहे.

त्यामुळे देशातील मुंबई आणि दिल्लीच्या विमानतळांवर उतरणाऱ्या विदेशी प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. चाचण्या देण्यासाठी लांबच लांब रांगा लागत असून त्यासाठी प्रवाशांना सध्या सहा-सहा तासांचा वेळ लागत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.