बाजाराचा मूड पाहून मालमत्ता विक्रीचा निर्णय (भाग-1)

घर विकण्याची प्रक्रिया ही घर खरेदीपेक्षा वेगळी आहे. मात्र, दोन्हीसाठी चांगली रणनिती तयार करून ती अंमलात आणणे महत्त्वाचे आहे. चांगल्या रणनितीच्या जोरावर मालमत्तेला चांगला भाव मिळू शकतो. काही वेळा जाहिरात देऊनही ग्राहक येत नाहीत. यासाठी घराची योग्य रितीने मार्केटिंग करणे तितकेच महत्त्वाचे आहे. मार्केटिंगसाठी वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करावा.

गुंतवणुकीच्या दृष्टीने खरेदी केलेली मालमत्ता ही बाजारातील मूड पाहून विकायला हवी. साधारपणे राहते घर हे आपत्कालिन स्थितीत, जमिनीचे चढलेले भाव किंवा नवीन घर खरेदी या आधारावर विकले जाते. एकंदरित जुन्या घरातून अधिकाधिक फायदा मिळवणे किंवा कर वाचवणे या बाबी लक्षात घेऊन त्याच्या विक्रीचा निर्णय घेतला जातो. नव्या घरात शिफ्ट होणाऱ्या मंडळींना जुने घर विकताना वेगळा विचार करावा लागतो. कारण नव्या घरासाठी एकरक्कम उभी करायची असेल तर अशा स्थितीत घर विक्रीच्या निर्णयाला अधिक महत्त्व येते. अर्थात या मंडळींना घराला जास्तीत जास्त किंमत येणे एवढीच बाब महत्त्वाची राहात नाही. घर विकण्याची रणनिती आखताना काही बाबी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील.

ग्राहक आपल्याकडे का येतील याचा विचार करा
जर आपण मालमत्ता विक्री करण्याचा निर्णय घेतला असेल तर तत्पूर्वी स्वत:ला काही प्रश्‍न विचारावेत. आपले घर ग्राहकांसाठी खरेदीसाठी आकर्षक आहे का, मालमत्ता गुंतवणूक म्हणून फायदेशीर आहे काय, कायदेशीररीत्या मालमत्ता खरेदी करणे सुरक्षित आहे काय, घराची कागदपत्रे, दस्तावेज तयार आहेत काय, यांसारख्या प्रश्‍नांची उकल करावी. याचे उत्तर होय असेल तर गरजेनुसार घर विक्री करावयास हरकत नाही.

आपले घर आकर्षित कसे राहील
रेडी पझेशनचे घर अतिशय टापटिप आणि सुसज्ज असते. अशा स्थितीत जुने किंवा दहा ते वीस वर्षे जुने घर विकताना त्याची योग्य डागडुजी करणे अपेक्षित आहे. जुने घर विकण्याचा निर्णय करण्यापूर्वी घरातील इंटेरियर आणि बाह्यभाग हा चांगला करावा. घराला रंगरंगोटी करणे, वायरिंग सुस्थितीत करणे, किचनच्या टाइल्स, टॉयलेट-बाथरूममधील टॅब खराब झाले असेल तर ते दुरुस्त करून घेणे, भिंतीच्या भेगा बुजविणे, पावसाचे पाणी भिंतीत झिरपत असेल तर त्याला वॉटरप्रुफिंग करून चांगल्या प्रतीचा रंग देणे, खिडक्‍या, दरवाजे, ग्रिल यांनाही रंग देऊन नवखेपणा आणणे यासारख्या कृती करणे आवश्‍यक आहे. घर आकर्षक आणि सुस्थितीत राहिले तर ग्राहकही खरेदीसाठी उत्सुक राहतो. काही खरेदीदारांना आपल्या मनाप्रमाणे घरात बदल करून हवा असतो. अशा मंडळींवर सध्याचे घर फारसे प्रभावी ठरत नाही. अशावेळी घरावर पैसे खर्च करण्यापूर्वी ग्राहकांची प्राथमिक माहिती मिळवावी. ग्राहकांचे मत घेऊन घराचे काम केले तर विक्रीसाठी अधिक सोयीचे ठरते आणि खरेदीदारही समाधानी राहतो.

बाजाराचा मूड पाहून मालमत्ता विक्रीचा निर्णय (भाग-2)

किंमत ठरवताना
कोणत्याही मालमत्तेची किंमत ही त्याच्या लोकेशनवर, बाजारभावावर अवलंबून असते. जमिनीला चांगला भाव असताना आणि मागणी असतानाच मालमत्तेची विक्री केल्यास चांगला लाभ होतो. अर्थात मालमत्तेची किंमत अव्वाच्या सव्वा ठेवली तर ग्राहक फिरकणारही नाहीत. घराच्या परिसरातील भावाचे आकलन करून रक्कम निश्‍चित करावी. मालमत्तेची किंमत जाणून घेण्यासाठी प्रॉपर्टी वेबसाइट, वर्तमानपत्रातील रिअल इस्टेटसंदर्भातील जाहिराती आदी माध्यमांची मदत घ्यावी. तसेच अलीकडच्या काळात झालेल्या परिसरातील मालमत्तेच्या व्यवहारातूनही घराची किंमत निश्‍चित करता येते. घर विक्रीचा व्यवहार निश्‍चित करताना खरेदीदाराकडून किंमत कमी करण्याचा आग्रह केला जाऊ शकतो. घराची किंमत ठरवताना ही बाब देखील लक्षात घ्यायला हवी.

– मानसी जोशी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.