शिक्रापूर -करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे शिक्रापूर येथील काही पदाधिकारी आणि मोजक्या व्यापाऱ्यांनी शिक्रापूर पुढील 14 दिवस बंद ठेवून लॉकडाऊन ठेवण्याच्या निर्णयाचे प्रांताधिकाऱ्यांनी खंडन केले आहे. शिक्रापूर पुन्हा सुरू राहणार असून काही काळ बंद राहणार असल्याने शिक्रापूरचे लॉकडाऊन दुसऱ्याच दिवशी गुंडाळले गेले आहे.
शिक्रापूर गाव 14 दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी काही मोजक्या व्यापारी आणि पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. बंदबाबतचे ग्रामपंचायतचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. याबाबत काही व्यक्तींनी हा निर्णय चुकीचा असल्याने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याकडे गाव गाव सुरू करण्याबाबत पाठपुरावा केला होता. शिक्रापूर येथे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे पाटील, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे, सरपंच हेमलता राऊत यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
यावेळी ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेत ग्रामपंचायतने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे प्रांताधिकारी देशमुख यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या चर्चेतून सर्व व्यावसायिक पूर्वीच्या बंदमुळे अडचणीत आले आहेत. त्यांना आधार देण्यासाठी सर्व दुकाने सुरू राहणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामस्थांनी दुपारनंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत सर्व दैनंदिन व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी प्रांताधिकारी देशमुख यांनी गावामध्ये आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करून त्याद्वारे नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले आहे.