पुणे(प्रतिनिधी) : केंद्रीय प्रदूषण मंडळाने (सीपीसीबी) नुकतेच यावर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मुर्तीवर बंदी टाकण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला होता. त्या निर्णयाला एक वर्षासाठी स्थगिती देण्यात आली असल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी (दि.22) जाहीर केले.
मात्र या स्थगितीला पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून प्रचंड विरोध केला जात असून, या निर्णयामुळे पुन्हा “पर्यावरण हरले, राजकारण जिंकले’ अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
पीओपी मुर्तीमुळे होणारे जलप्रदूषण आणि त्यामुळे नागरिकांचे आरोग्य व पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता, सीपीसीबीने यंदापासून पीओपी मुर्तीवर बंदी टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र या निर्णयामुळे ज्या मुर्तीकारांनी मुर्ती बनविल्या आहेत त्यांचे आर्थिक नुकसान होईल. आधीच करोना परिस्थितीमुळे आर्थिक संक़ट निर्माण झाले असताना, मुर्तीकारांसमोरील संकट वाढू नये, यासाठी पीओपी मुर्तीवरील बंदीचा निर्णय एक वर्षासाठी स्थगित करत असल्याचे जावडेकर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून जाहीर केले.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1221290371543999/
मात्र, या स्थगितीला पर्यावरणप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. हा निर्णय पर्यावरणाविरोधी असून, ही स्थगिती रद्द केली जावी. केंद्राचे पर्यावरण मंत्रालय मुर्तीकारांच्या अर्थिक परिस्थितीबाबत विचार करत आहे, मात्र पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामाचा विचार का नाही करत? आर्थिक नुसनीची भरपाई करता येईल, मात्र पर्यावरणाचे अणि नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची भरपाई कशी करणार? गेल्या अनेक वर्षांपासून या बंदीची मागणी पर्यावरण अभ्यासकांकडून केली जात आहे, त्यावेळीच निर्णय का नाही घेतला? सरकारचा हा निर्णय अत्यंत चूकीचा असून, स्थगिती निर्णय त्वरित रद्द करून मातीच्या मुर्तींना प्रोत्साहन दिले पाहिजे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.