सहकारी संस्था, स्थानिक निवडणुका राष्ट्रवादी लढविणार

पक्षाच्या मुक्त चिंतन बैठकीत घेतला निर्णय

अकोले  – अकोले तालुक्‍यातील अगस्ती सहकारी साखर कारखाना, अकोले तालुका अमृतसागर दूध संघ, अकोले तालुका खरेदी-विक्री संघ, अकोले तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती व अन्य संस्थांची दयनीय अवस्था झालेली आहे. या संस्था ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्रपक्षांनाबरोबर घेऊन निवडणुका लढवेल, असा निर्णय पक्षाच्या मुक्त चिंतन बैठकीत घेण्यात आला.

त्याचबरोबर ग्रामपंचायत, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या भविष्यातील होणाऱ्या निवडणुकांबाबतही पक्ष काळजीपूर्वक लक्ष घालून व मित्रपक्षांना सोबत घेऊन आपल्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करील, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. शिवाय पक्षातील नवे-जुने असा वाद न करता नवीन कार्यकारिणी अस्तित्वात आणण्यासाठी नवनियुक्त आमदारांनी लक्ष घालावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

विधानसभा निवडणूक निकालानंतर ही झालेली पहिली मुक्त चिंतन बैठक असल्याने निवडणुकीतील यश, त्याचबरोबर भावी वाटचाल, पक्ष नवीन कार्यकारणी नियुक्ती यावर सर्वच उपस्थितांनी परखड मते मांडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त लेखापाल व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते एम. जी. भांगरे होते.

नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे, पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, प्रा. सुरेश खांडगे, प्राचार्य संपतराव नाईकवाडी, भानुदास तिकांडे, संदीप शेणकर, अमित नाईकवाडी, सोमनाथ नवले, राजीव कुमकर, प्रा. चंद्रभान नवले, आर. के. उगले, रवी मालुंजकर, अंकुश वैद्य, संजय वाकचौरे, विनोद हांडे, महेश वैद्य, भागवत कुमकर, जगदीश तळेकर, सुरेश शिंदे, सुभाष हासे, विवेक चौधरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आ. डॉ. लहामटे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यासंदर्भात तहसीलदारांना दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि तातडीने पंचनामे करण्याची सूचना केली. विधानसभा निवडणुकीच्या विजयामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व मित्रपक्षांचे मोठे योगदान राहिले. त्यामुळे त्यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळेस पारित करण्यात आला.

उपरोक्त कार्यकर्त्यांच्या इतरही कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना पक्ष वाढी संबंधात आपापले विचार मांडले. प्रास्ताविक आर. के. उगले यांनी केले आणि आपल्या या भाषणांमध्ये त्यांनी तालुक्‍यातील व संगमनेर तालुक्‍यातील पक्ष विजयासाठी हातभार लागलेल्या सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन करून संदीप शेणकर यांनी शेवटी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.